पनवेल पालिकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:14 AM2018-02-22T02:14:56+5:302018-02-22T02:14:59+5:30
पनवेल महानगरपालिकेची दि. २१ रोजी पार पडलेली तहकूब महासभा पुन्हा एकदा गोंधळाने गाजली. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत
पनवेल : पनवेल महानगरपालिकेची दि. २१ रोजी पार पडलेली तहकूब महासभा पुन्हा एकदा गोंधळाने गाजली. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत, प्रशासन झोपा काढत असल्याचा आरोप केल्यानंतर संतापलेल्या आयुक्तांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे, प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने विरोधकांनीही या वेळी सभात्याग केला.
शनिवारी तहकूब झालेली महासभा बुधवारी पुन्हा सुरू झाली. खारघरचे पालिका अधिकारी श्रीराम हजारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली. हजारे यांची चौकशी करून त्यांचे म्हणणे सभागृहात उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मांडले. मात्र, सत्ताधाºयांनी त्यांना सभागृहात बोलावून उत्तर देण्याची मागणी केली. या वेळी हजारे यांनी आपली बाजू मांडली. मात्र, हजारे खोटे बोलत असल्याचे सांगत त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनी केल्यानंतर महापौरांनी तसे आदेश या वेळी दिले. विशेष म्हणजे, या विषयावर सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पुन्हा एकदा थकित एलबीटी वसुलीचा मुद्दा उपस्थित करत पालिकेच्या मार्फत एलबीटीधारकांची योग्य माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. एकूण ३३८ एलबीटीधारकांची यादी मिळाली आहे. मात्र, कोणावर किती एलबीटी थकित आहे. यासंदर्भात योग्य माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. शिवजंयतीच्या दिवशी शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची योग्य साफसफाई झाली नसल्याचा आरोप जगदिश गायकवाड यांनी केला. या महासभेत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी प्रशासनामार्फत कामे होत नसल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सभागृहनेते परेश ठाकूर व नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी केला.
पालिकेच्या अद्याप पार पडलेल्या महासभेत घेण्यात आलेल्या एकूण ११८ ठरावांपैकी किती ठरावांची अंमलबजावणी झाली. याची माहिती देण्याची मागणी भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी केली. या महासभेत अद्याप स्वच्छ सर्वेक्षणावर किती खर्च झाला आहे. चकाचक पनवेल कुठे आहे? स्वच्छतेच्या नावाखाली बोगसगिरी सुरू असल्याचे सांगत सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केला. या वेळी स्थायी समिती सभापती यांनी प्रशासन झोपा काढत असल्याचा आरोप केला. वारंवार प्रशासनाला टारगेट करत असल्याचे सांगत पालिकेच्या अधिकाºयांसह सभात्याग केला. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सत्ताधारी मनमानी करत असून विरोधी पक्षातील सदस्यांना बोलण्याची संधी देत नसल्याचा आरोप केला. विषयपत्रिकेवरील विषय सोडून मुद्दामहून सत्ताधारी सभागृहाचा वेळ वाया घालत असल्याचे संगितले.
विरोधकांचाही सभात्याग
सत्ताधारी भाजपा सदस्यांच्या मार्फत मुद्दामहून प्रशासनावर आरोप करून पटलावर असलेल्या विषयांवर चर्चा न करता, सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो. आयुक्तांनी सभात्याग केल्यानंतर प्रशासनाच्या मार्फत उत्तर देण्यास कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने या वेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारीच विकासकामांना अडथळा घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रशासनाच्या विरोधात असंसदीय भाषा वापरत असल्याने सभात्याग
सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या वतीने असंसदीय भाषा व सततचे आरोप केल्यामुळे आयुक्तांसह सर्व अधिकाºयांनी सभात्याग केला असल्याचा खुलासा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केला. प्रशासनाला घेऊन सभागृह चालविण्याची आवश्यकता असताना, तसे न केल्यामुळेच सभात्याग करण्यात आला असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.