राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:59 PM2019-07-19T23:59:10+5:302019-07-19T23:59:21+5:30

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराला नवी मुंबईमधून ८४ हजार मतांची आघाडी मिळाली.

Unrest among NCP-Congress corporators | राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

Next

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराला नवी मुंबईमधून ८४ हजार मतांची आघाडी मिळाली. याचा धसका राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी घेतला असून, पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील काही दिवसांमध्ये पक्षामध्ये उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईच्या राजकारणावर अडीच दशकांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व होते; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजीव नाईक यांचा ठाणे मतदारसंघातून पराभव झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांनाही पराभवास सामोरे जावे लागले. यानंतर २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीत पक्षातील अनेक महत्त्वाच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याचा फटका निवडणुकीमध्ये बसला व स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता टिकवावी लागली. यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही राष्ट्रवादीच्या उमदेवाराला नवी मुंबईमधील मताधिक्य मिळाले नाही. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ४४, ३६३ व बेलापूरमधून ३९,७२४ मते मिळाली. मनपा क्षेत्रातून तब्बल ८४ हजार मतांची आघाडी शिवसेनेला मिळाली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधूनही सेनेलाच आघाडी मिळाली आहे. याचा धसका नगरसेवकांनी घेतला आहे. मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारले असून अशीच स्थिती राहिली तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळविणे अशक्य होईल, असे वाटू लागले आहे. गणेश नाईक यांनीच भारतीय जनता पक्षात जावे, अशी मागणी होऊ लागली होती; परंतु नाईक यांनी मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांनाही गप्प बसावे लागले.
राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असला तरी नगरसेवक व पुढील महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवसेना व किंवा भाजपमध्ये जाण्याची ओढ लागली आहे. एक गट शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे. १३ नगरसेवकांचा दुसरा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. यामध्ये झोपडपट्टी परिसरात वर्चस्व असलेल्या एक मोठ्या पदाधिकाºयाचाही समावेश आहे.
या नगरसेवकांनी बैठका सुरू केल्या असून, १५ आॅगस्टपर्यंत पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षांतराच्या चर्चेने नवी मुंबईमधील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये जाण्यास तयार असलेले १३ नगरसेवक कोण? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
>नाईकांच्या पक्षांतराचीही चर्चा
पाच वर्षांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही चर्चा वाढली. यानंतर नाईक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु या वक्तव्याचा विरोधी अर्थ घेतला जात आहे. शेवटच्या क्षणी विरोधकांना धक्का देण्यात नाईक वाकबगार असून नगरसेवकांची नाराजी व पक्षांतराची चर्चा ही सुद्धा राजकीय खेळी असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.
>राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये फूट पडणार असल्याच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नाही. सर्व नगरसेवक व पदाधिकारी पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गुरुवारी महासभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीलाही नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडणे अशक्य आहे.
- अनंत सुतार,
जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Unrest among NCP-Congress corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.