- योगेश पिंगळेनवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महापालिकेने वेस्ट टू बेस्ट ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सोसायट्यांनी या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जुन्या पादत्राणांवर पुनर्प्रकिया करून विविध चप्पल बनविण्यात येणार आहेत. त्याचा फायदा दुर्गम भागात होणार आहे..या संकल्पनेमध्ये जुनी वापरात नसलेली पादत्राणे सोसायट्यांनी एकत्र करून महापलिकडे सुपुर्द करायची आहेत. ही पादत्राणे महापे येथील ग्रीन सोल कंपनीकडे जमा केली जाणार असून, कंपनी या जुन्या पादत्राणांवर पुनर्प्रकिया करून, लहान मुलांच्या चप्पल, सँडल, बूट तयार करणार आहे. त्यांचे राज्यातील विविध दुर्गम भागातील विद्यार्थी, लहान मुलांना मोफत वाटप करणार आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे यांच्या मागदर्शनाखाली शहरात सदर संकल्पना राबविण्यात येत आहे. मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे त्यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभागाचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी नेरुळमधील विविध सोसायट्यांमधील नागरिकांना याबाबत आवाहन केले होते. नेरुळ सेक्टर १९ येथील निलसिद्धी सोसायटीमधील रहिवाशांनी या आवाहनाला प्रतिसाद देत वापरात नसलेली पादत्राणे कचऱ्यात न टाकता महापालिकेकडे सुपुर्द केली आहेत.
महापालिकेची ''वेस्ट टू बेस्ट'' संकल्पनानवी मुंबई शहरातील कचऱ्याचे ओला, सुका, तसेच ई-कचरा असे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तर सुक्या कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाते, परंतु वापरात नसलेल्या चप्पल, बूट, सँडल आदी पादत्राणेही कचऱ्यात टाकली जातात. त्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी महापालिकेने ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.