- वैभव गायकरपनवेल : आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वत्र विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे. पनवेलमधील बहुप्रतीक्षित असे उपजिल्हा रुग्णालयाचे देखील घाईघाईत लोकार्पण करण्यात आले. या वास्तूला महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणून शासनाने नुकतेच याकरिता परिपत्रक काढले आहे. मात्र एकूणच परिस्थिती पाहता हे रुग्णालय अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे.१२0 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात २0 खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदन गृह या रु ग्णालयात आहे. मात्र शवविच्छेदन केंद्राचे काम पूर्ण झाले नसल्याने अद्यापही मृतांचे शवविच्छेदन पालिका मुख्यालयासमोरील मोडकळीस आलेल्या एका खोलीतच करावे लागत आहे. संपूर्ण तालुक्यासाठी शासकीय शवागार नाही. उपजिल्हा रुग्णालयातील शवागार कार्यान्वित होण्यासंदर्भात अद्यापही काही हालचाली होताना दिसून येत नसल्याने पनवेलमधील बेवारस मृतदेह नवी मुंबईमध्येच ठेवावे लागणार आहेत. या रुग्णालयात औषधे व शस्त्रक्रि या करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सक आदी याठिकाणी असणार आहेत.मात्र पदे मंजूर झाली असून सध्याच्या घडीला केवळ एक आर्थोपेडिक, एक बाल रोग तज्ज्ञ यांच्यावर संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाची धुरा आहे. विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालयातील एक्सरे सेंटर देखील कार्यान्वित झाले नसल्याने उपचारासाठी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल झालेल्या रु ग्णांना एक्सरे काढण्यासाठी रु ग्णालयाबाहेर खेटे मारावे लागणार आहेत. सर्वच मशिनरी बंद असल्याने याठिकाणी येणाऱ्या रुग्णांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बहुप्रतीक्षित उपजिल्हा रुग्णालयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णालय सुरू करण्यासाठी वेळोवेळी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. सेनेचे चंद्रशेखर सोमण यांनी देखील प्रदीर्घ लढा हे रुग्णालय पूर्णत्वाला येण्यासाठी दिला. मात्र बहुप्रतीक्षित उपजिल्हा रु ग्णालयाचे काम पूर्ण झाले. मात्र याठिकाणच्या अंतर्गत सोयी सुविधा कार्यान्वित करण्यासाठी नव्याने लढा देण्याची गरज आहे. शासकीय पातळीवर त्याकरिता पुन्हा पाठपुरावा करण्याची गरज आहे.
रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात पंखे बसविण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसात ते पूर्ण झाल्यावर नव्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम केले जाईल. एक्सरे सेंटर देखील लवकरच सुरू होणार आहे.- डॉ. नागनाथ येम्पल्ले,वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रु ग्णालय, पनवेल