कळंबोलीमध्ये उभारणार अद्ययावत पशू रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:55 PM2019-05-24T22:55:26+5:302019-05-24T22:55:30+5:30
पनवेल परिसरात प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारणे गरजेचे आहे.
वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कळंबोलीत पाळीव प्राण्यांबरोबरच मोकाट पशूपक्ष्यांसाठी अद्ययावत रुग्णालय उभे राहत आहे. सिडकोने काढलेल्या टेंडरला प्रतिसाद देत चार संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. अंतिमत: केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल या संस्थेला हे भूखंड देण्यात आले आहेत. ही जागा सुमारे ८००० चौरस मीटरची असून रुग्णालय उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पशू रुग्णालयासाठी भूखंड देताना सिडकोने कमीत कमी ५० टक्के प्राण्यांवर मोफत उपचाराची अट भूखंडांचे टेंडर काढताना ठेवली होती, अशी माहिती सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांनी दिली.
कळंबोलीमधील सेक्टर १६ मध्ये डी-मार्टच्या बाजूला हा भूखंड आहे. पीपल फॉर अॅनिमल ही संस्था टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालयाची इमारत उभारणार आहे. रुग्णालयात लागणारे साहित्यही टाटा ट्रस्ट ही संस्था उपलब्ध करून देणार आहे. २०२१ पर्यंत रुग्णालयाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पनवेल परिसरात प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र, सध्याच्या घडीला असे एकही पशू निवारा केंद्र नसल्याची माहिती या वेळी आठ वर्षांपासून प्राण्यांसाठी काम करणारे प्राणिमित्र शैलेश खोतकर यांनी दिली.
जंगली पशूंनी पुन्हा जंगलात सोडण्यात येते. मात्र, बैल, गाय, घोडा, गाढव, कुत्रा या मोठ्या प्राण्यांना कुठे ठेवणार? याकरिता प्राण्यांसाठी निवारा केंद्रांची उभारणी करणे गरजेचे मत यावेळी खोतकर यांनी व्यक्त केले.