मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल,आयएमसी, इंडियन आईल , आयओटीएल, सुरज ॲग्रो आदि मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात अत्यंत घातक, धोकादायक, ज्वलनशील आणि विषारी पदार्थ, वायु,रसायनांची हाताळणी केली जाते.तसेच उरण परिसरात ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस आदि प्रकल्पांचाही त्यामध्ये समावेश आहे.या रासायनिक प्रकल्पात वारंवार आग,घातक विषारी केमिकल गळतीच्या घटना घडत असतात.अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांकडे सर्वच अद्ययावत,स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जातो.मात्र जेव्हा दुर्घटना घडते त्यावेळी कंपन्यांचे सर्वच दावे फोल ठरतात.यंत्रणा उघड्या पडतात.यामुळे हे रासायनिक प्रकल्प उरणकरांसाठी केव्हाही धोकादायक ठरू शकतात.हे उरणकरांनी वारंवार अनुभव घेतलेला आहे.सिध्दही झाले आहे.
उरण परिसरातील हे रासायनिक प्रकल्पांची रासायनिक पदार्थ साठविण्याची क्षमता प्रचंड आहे.या रासायनिक प्रकल्पात आग, स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास रासायनिक प्रकल्पाच्या ३० किमी परिघातील परिसर बेचिराख होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्वालामुखीवर उरण असल्याची भीतीही या आधीच अनेक तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे.मात्र रासायनिक कंपन्या यातुन कोणताही बोध घेतल्यास तयार नाहीत.त्यामुळे रासायनिक प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाची २० लाख एलपीजी गॅस सिलिंडर साठवणुकीची क्षमता.अशा या मोठ्या प्रमाणावर साठवून क्षमता असलेल्या शुक्रवारी ओएनजीसी प्रकल्पात शुक्रवारी (८ सप्टेंबर) घडलेली तेलगळतीची घटना उरणकरांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे.याआधीही प्रकल्पात आग, तेलगळतीची घटना घडल्या आहेत.तेल गळती वेळीच आटोक्यात आली नसती तर ओएनजीसी प्रकल्पाशेजारीच असलेली अनेक गावे आणि लाखो रहिवाश्यांवर ऐन गणेशोत्सवातच गंडातर आले असते.
ओएनजीसी प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या आग आणि तेलगळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.बोकडवीरा येथील वायुविद्युत केंद्रातही मागील वर्षी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत एका अभियंत्यासह दोन कामगार मृत्यु पावले होते.दुदैवाने यांचे कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक ना शासनाला ना संबंधित विभागाच्या शासकीय यंत्रणेला आहे.ही बाब अत्यंत धोकादायक ठरू शकते.