मासळीच्या निर्यातीसाठी मच्छीमारांसाठी करंजा मच्छीमार बंदर वरदान ठरत असताना आता अनोळखी व्यापाऱ्यांशी केलेले व्यवहार मच्छीमारांच्या अंगलट येत आहेत. या व्यापाऱ्यांनी मच्छीमारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. याबाबत उरण पोलिस ठाण्यात मच्छीमारांनी तक्रार केली आहे. मच्छीमारांवर या प्रकारामुळे ऐन होळीत आर्थिक संकट कोसळले आहे.
मासळीच्या निर्यातीसाठी रायगड जिल्ह्यासह स्थानिक हजारो मच्छीमारांना करंजा मच्छीमार बंदर फायदेशीर ठरले आहे. या बंदरातून चार महिन्यांतच सुमारे २५०-३०० कोटी रुपयांची मासळी निर्यात करण्यात आली. मात्र मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी करंजा मच्छीमार बंदरात मासळी खरेदी, विक्रीतून अंग काढून घेतले. याचा फायदा उठवत स्थानिक मच्छीमार व्यापारी दलालांना हाताशी धरून काही नव्या निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी बंदरात शिरकाव केला.
अशी केली फसवणूक
सुरुवातीला निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांना मालाचे पैसे देऊन मच्छीमारांचा विश्वास संपादन केला. मात्र कालांतराने स्थानिक मच्छीमारांना खरेदी केलेल्या मासळीचे पैसे देण्यात टाळाटाळ करू लागले. मासळी व्यापारी, मच्छीमारांचे कोट्यवधींची थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी पळ काढला आहे.
स्थानिक दलालांवर टाकला विश्वास
शेकडो मच्छीमारांनीही परिचित स्थानिक दलालांवर विश्वास टाकून व्यवहार केले. सुरुवातीला त्यांनी मच्छीमारांना पैसे दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
उपासमारीची वेळ
निर्यातदारांनी स्थानिक मच्छीमारांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याने ऐन होळीच्या सणातच सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज काढून, दागदागिने गहाण, विक्री करून खलाशांचे पगार, देणी चुकविण्याची वेळ अनेक मासळी व्यावसायिकांवर येऊन ठेपली आहे.
स्थानिक मच्छीमारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच उरण पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. निर्यातदार कंपन्यांनी मासळीचे पैसे अदा न केल्याने मच्छीमारांची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे - रमेश नाखवा, स्थानिक मच्छीमार