उरणमध्ये गॅरेजला लागलेल्या आगीत दोन ट्रेलरसह लाखोंची मालमत्ता भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 06:41 PM2018-01-08T18:41:00+5:302018-01-08T20:33:45+5:30
जासई हद्दीतील अश्विनी लॉजिस्ट्रिकच्या दोन गॅरेजला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले दोन ट्रेलर्स आणि टायर जळून खाक झाले.
उरण : जासई हद्दीतील अश्विनी लॉजिस्ट्रिकच्या दोन गॅरेजला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले दोन ट्रेलर्स आणि टायर जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या दोन बंबाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीत जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार कविता गोडे यांनी दिली.
जासई ग्रामपंचायतीच्या हद्दीत अश्विनी लॉजिस्ट्रिक कंपनी आहे. कंपनीचे दोन गॅरेज आहेत. दोन्ही गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती आणि ट्रेलर दुरुस्तीचे काम केले जाते. गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात टायर आणि तत्सम वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी गॅरेज शेजारी असलेल्या गवताला लागलेल्या आगीमुळे गॅरेजला आग लागली. पाहता पाहता आगीने उग्र रुप धारण केले. गॅरेजमध्ये असलेले टायर आणि दोन ट्रेलर्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे आग आणखीनच भडकली.
कानठल्या उठविणा-या स्फोटाचे आवाज आणि धुराच्या लोळाने परिसरात घबराट पसरली. पोलीस महसूल विभागाला माहिती मिळताच आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सिडको आणि जेएनपीटीच्या दोन बंबाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र तरीही आगीच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू असल्याचे उरण पोलिसांकडून सांगण्यात आले.