उरणमध्ये शेतजमीन नापीक होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:23 PM2019-07-14T23:23:37+5:302019-07-14T23:23:46+5:30

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांवर उरण परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे.

In Uran, the risk of agricultural land becoming barren | उरणमध्ये शेतजमीन नापीक होण्याचा धोका

उरणमध्ये शेतजमीन नापीक होण्याचा धोका

Next

उरण : पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांवर उरण परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी थेट शेतजमिनीत घुसल्याने पूर्व भागातील शेकडो एकर शेतजमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
उरणमध्ये अनेक प्रकल्प, नवनवीन कंपन्या उभ्या राहत आहेत. या प्रकल्पांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीवर जाण्याचा रस्ताही बाधित केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कंबरभर पाण्यातून अथवा नाल्यातून वाट काढत शेतावर पोहोचावे लागत आहे. याबाबत तोडगा काढण्याबाबत शेतकºयांनी दोन वर्षांपूर्वी रायगडच्या जिल्हाधिकाºयांना पत्रही दिले होते. मात्र, अद्याप कोणताही मार्ग काढण्यात आला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पावसाचे पाणी जाणाºया नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आल्याने पाण्याला वाट मिळेल तिथे ते साचते. परिणामी, शेतीच्या बांधांना मोठ्या प्रमाणात खांडी (भगदाड) पडत आहे. शिवाय उन्हाळ्यात काम केले तरी पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने बांध कमकुवत झाले आहेत. त्यामुळे शेतजमीन नापीक होण्याचा धोका बळावला आहे.
उरणच्या पूर्व भागातील जमिनींवर भांडवलदारांचा डोळा आहे. मात्र, शेती विकण्यास तयार नसल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अडचणी निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे. नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले असले तरी संबंधित प्रशासनाकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ते शेतजमिनीत घुसते आणि शेती नापीक होत आहे. शेती नापीक झाली की शेतकरी आपसूकच जमिनी विकतील अशा आशेवर भांडवलदार, दलाल आहेत.
उरणच्या पूर्व भागात वसलेल्या एकाही प्रकल्पाने शेतीत जाण्यासाठी शेतकºयांना रस्ता सोडलेला नाही. प्रकल्पाच्या चारही बाजूनी किमान दहा फुटांचा रस्ता ठेवणे बंधनकारक असतानाही याबाबत जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा प्रकल्पांवर कारवाई करण्याबाबत महसूल खात्याचे अधिकारीही चालढकल करीत आहेत. त्याचप्रमाणे या प्रकल्पाना परवानग्याच्या खिरापती वाटणाºया स्थानिक ग्रामपंचायतीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे, त्यामुळे शेती पाण्याखाली गेली असून शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कृषी विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी निम्म्याहून अधिक शेतकºयांनी तक्रारी करणे गरजेचे असल्याचे कृषी अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे शेती करावी की तहसील कार्यालय, कृषी कार्यालयांत कागदी घोडे घेऊन नाचवावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
>नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने शेती पाण्यात
सध्या खोपटे आणि पिरकोन गावाच्या मधोमध असलेली पारांगीखार येथील शेतजमीन अखेरची घटका मोजत आहे. येथील खाडीतील पाणी नाल्याच्या बांधालगत असलेल्या शेतीत घुसल्याने शेती नापीक झाली आहे. शिवाय बांधही अनेक ठिकाणी फुटला आहे.
>पाणदिवे, पिरकोन गावापासून पाण्याचा प्रवाह वेगाने नाल्यात येतो. मात्र, नाल्यात झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे वाट मिळेल तिथून पाणी वाट काढते. शेतीचे बांध कमकुवत असल्याने खांडी फुटून पाणी शेतात घुसते. या प्रकाराबाबत परिसराची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Web Title: In Uran, the risk of agricultural land becoming barren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.