उरण तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांना ग्रासले बंडाळीने
By admin | Published: February 7, 2017 04:23 AM2017-02-07T04:23:33+5:302017-02-07T04:23:33+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या उरण गण आणि गटाच्या एकूण १२ जागांसाठी सोमवारी काँग्रेस-शेकाप आघाडी, शिवसेना, मनसे आणि अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आणि रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले
उरण : रायगड जिल्हा परिषदेच्या उरण गण आणि गटाच्या एकूण १२ जागांसाठी सोमवारी काँग्रेस-शेकाप आघाडी, शिवसेना, मनसे आणि अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आणि रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये जि. प. च्या चार जागांसाठी २७ तर पं. स. च्या ८ जागांसाठी ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
उरणमध्ये राजिप गटात चार तर पंचायत समितीच्या गणात आठ जागा आहेत. चाणजे, चिरनेर, नवघर, जासई या चार जि.प.च्या आणि पं. स.च्या केगाव, चाणजे, नवघर, भेंडखळ, चिरनेर, आवरे, जासई, विंधणे या आठ अशा एकूण १२ जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सोमवार अखेरच्या दिवशी जिल्हा प्रमुख तथा आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठी रॅली काढली. राघोबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत उरण शहरातून काढलेल्या रॅलीत तालुका प्रमुख बी. एन. डाकी, उपतालुका प्रमुख जयवंत पाटील, विभागप्रमुख कमलाकर पाटील, नीळकंठ घरत, उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर, शहर प्रमुख महेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेवक अतुल ठाकूर, सेनेचे अन्य पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
सेना-भाजपाची युती तुटल्याने भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी करीत उरणमधील गण आणि गटातून भाजपाने उमेदवारही जाहीर केले आहेत. भाजपानेही शक्तिप्रदर्शन करीत आणि जाहीर सभा घेवून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जि. प. आणि पं. स. शेकाप काँग्रेस अशी शेवटच्या क्षणी आघाडी झाली आहे. शिवसेनेबरोबर आघाडी करण्याला वरिष्ठांनी नकार दर्शविल्याने अखेर काँग्रेसने शेकापबरोबर आघाडी केली आहे. शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी आघाडीच्या वतीने रॅलीही काढण्यात आली होती. पक्षीय झेंडे उंचावत आघाडीने काढलेल्या रॅलीत माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, मिलिंद पाडगावकर, महेंद्र ठाकूर, राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, उमेदवार आणि आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनसेबरोबरच अपक्षांचेही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये उरण उत्क र्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांचाही समावेश आहे.
नाराज कार्यकर्त्यांची बंडाळी सर्वच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकांना मोठ्या बंडखोरीला सामोरे जाण्याची पाळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)