उरणकरांना पावसाने झोडपले
By admin | Published: June 29, 2017 02:59 AM2017-06-29T02:59:14+5:302017-06-29T02:59:14+5:30
बुधवारी पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने उरणकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, केळवणे, करंजा, केगाव,
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : बुधवारी पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने उरणकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, केळवणे, करंजा, केगाव, भेंडवळ आदी गावांतील अनेक रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर चिरनेर गावातील नाले ओसंडून वाहू लागल्याने रस्तेही जलमय झालेत. यामुळे चिरनेर गावात पूर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दमदार पावसामुळे आणि समुद्राच्या पाण्यामुळे खारबंदिस्ती फुटून सुमारे अडीच हजार एकर शेती क्षेत्रात समुद्राचे पाणी शिरून नापीक झाल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत. पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्तांची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात येत असून, शासकीय यंत्रणा आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्यात गुंतली असल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.
मंगळवारी मध्यरात्रीपासून उरण परिसरात मुसळधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली होती. मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या पावसाला समुद्राच्या भरतीची साथ मिळाली. यामुळे नदी, नाले, गटारे तुडुंब भरल्याने उरण परिसरात अनेक गावांत पावसाचे पाणी शिरले. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, करंजा, केगाव, भेंडखळ आदी गावांतील अनेक रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. घरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडालीच. त्याशिवाय घरातील जीवनाश्यक आणि मौलिक सामान पावसाच्या पाण्याने भिजून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाल्याच्या अनेक रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
तर केळवणे, पुनाडे आणि वशेणी गावांतील खारबंदिस्ती बंधारे फुटून समुद्राचे पाणी शेतीत घुसल्याची तक्रार आ. प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. समुद्राचे पाणी शिरून सुमारे अडीच हजार एकर शेत जमिनीत समुद्राचे पाणी शिरले असून, जमीन नापीक झाली आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून दिली.