उरणमधील गोदामाला आग, प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामातील ज्वलनशील के मिकलने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:46 AM2018-03-15T02:46:32+5:302018-03-15T02:46:32+5:30
वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली.
उरण : तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. वेश्वी गावातील रहिवासी भयभीती होत घरातून आपल्या कुटुंबासह बाहेर पळाले. या आगीच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या होत्या की गावात एकच हाहाकार माजला. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.
उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिक या माल साठवून ठेवणाऱ्या गोदामात गोदाम व्यवस्थापकांनी ज्वलनशील केमिकलचा साठा शासकीय नियमांची पायमल्ली करून ठेवला आहे. बुधवारी या गोदामात ज्वलनशील केमिकलचा साठा असणाºया परिसरात काही कामगार वेल्डिंगचे काम करीत होते. यावेळी या वेल्डिंगच्या कामातील आगीची एक ठिणगी ज्वलनशील केमिकलच्या साठ्यावर पडली असता, या केमिकलच्या पदार्थाने पेट
घेतला.
यावेळी केमिकलला लागलेल्या आगीची तीव्रता एवढी होती की वेश्वी गाव परिसरात आगीच्या ज्वाळा, धूर, स्फोटाचे आवाज पसरले. वेश्वी गावच्या नागरी वस्तीजवळच हा माल साठवून ठेवणारे गोदाम असल्याने येथील रहिवासी भीतीपोटी घरातून बाहेर पडले. यावेळी गावात एकच हाहाकार माजला.
वेश्वी गावचे माजी उपसरपंच विलास पाटील यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. यावेळी पोलीस यंत्रणा, सिडको, जेएनपीटी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेश्वी गावात धाव घेऊन ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ज्वलनशील केमिकलच्या साठ्याला लागलेल्या आगीची तीव्रता एवढी होती की अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या जेएनपीटी बंदराच्या वाहतूककोंडीत अडकल्याने यावेळी उपस्थित नागरिकांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. या आगीत जीवितहानी झाली नाही.
प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामाला लागलेली आग तीन तास झाले तरी आटोक्यात आली नाही, त्यामुळे नेमके काय नुकसान झाले समजणे कठीण आहे, अशी माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते.