उरणच्या पागोटे-कुंडेगाव खाडीत मृत माशांचा खच: कंपन्यांतील रसायन मिश्रित सांडपाणी समुद्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 08:54 PM2022-12-15T20:54:21+5:302022-12-15T20:54:30+5:30
वारंवार घडणाऱ्या प्रकाराकडे प्रदुषण विभागाचे दुर्लक्ष: मच्छीमार संतप्त
मधुकर ठाकूर
उरण: तालुक्यातील पागोटे-कुंडेगाव खाडीत गुरुवारी (१५) हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले आहेत.परिसरातील कंपन्यांमधुन सातत्याने रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी समुद्र आणि खाडीत सोडण्यात येत असल्यानेच मासे मृत होत असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून केला जात आहे.
उरण तालुक्यात अनेक लहान-मोठ्या खाड्या आहेत. या खाड्यांमध्ये दुय्यम प्रकारची मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते.परिसरातील शेकडो स्थानिक मच्छीमार या खाड्यांमध्ये मासेमारी करून आपल्या कुटुंबियांची उपजीविका करीत असतात. मात्र द्रोणागिरी परिसरात असलेल्या खाडी, समुद्र किनाऱ्यावर अनेक कंपन्या,गोदामे उभारण्यात आली आहेत.या कंपन्या, गोदामातून सातत्याने रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी समुद्र आणि खाडीत सोडण्यात येत आहे. रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करताच थेट समुद्र, खाड्यात सोडण्यात येत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर सागरी प्रदुषण होते.
खाड्या, समुद्रातील दुषित होत असल्यानेच मासे मृत होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.गुरुवारीही (१५) पागोटे-कुंडेगाव येथील खाडीत हजारो मृत माशांचा खच पडल्याचे आढळून आले आहे.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.मात्र रसायन मिश्रित दुषीत सांडपाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करताच थेट समुद्र, खाड्यात सोडणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यानेच वारंवार मासे मृत्यूमुखी पडण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी केला आहे.तर संतप्त झालेल्या येथील स्थानिक मच्छीमारांनीही प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच दोष दिला आहे.
याप्रकरणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन समुद्र, खाडी किनाऱ्यावर जाऊन पाहणी केली आहे.
पाहणी अहवालानंतर कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी दिली.