लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल बसस्थानकालगत अनेक झोपड्यांचा वापर व्यावसायिक कारणाकरिता केला जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नुकतीच या ठिकाणची पाहणी केली. त्या वेळी अनेक कमर्शियल झोपड्या भाडेतत्त्वावर दिल्या असल्याचे उघड झाले. झोपड्यांचा वापर राहण्याकरिता न करता, त्यात व्यवसाय थाटण्यात आले आहेत आणि त्याही भाड्याने दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले.शहरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या झोपड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कारणासाठी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. विशेषत: पनवेल बसस्थानकाजवळील झोपड्यांमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी छोटे-छोटे खाद्य पदार्थ, गॅरेज, मोबाइल यांसारखी दुकाने चालू आहेत. काही जणांनी आपल्या झोपड्या भाडेतत्त्वावर व्यवसायासाठी दिल्या आहेत.मोक्याच्या जागेवरील झोपड्यांत थाटण्यात आलेल्या दुकानात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने झोपडीवाले हे ‘प्राइम लोकेशन’ सोडण्यास तयार नाहीत. आम्ही गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून येथे आहोत. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीकरिता सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. हा अर्ज चौकशीकरिता पनवेल तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार तहसीलदारांनी सर्व्हेक्षण करून, परवानगी देण्यास हरकत नसल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला असल्याचे झोपडपट्टी रहिवासी संघाचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाने याअगोदर नोटिसा बजावून झोपड्यांमध्ये तुम्ही राहू शकता; परंतु व्यवसाय नियमाने करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वत:हून हे अतिक्र मण काढून घ्या, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी गुरुवारी पनवेल बसस्थानकासमोरील दुकानदारांकडे कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रे तपासली असता, अनेक दुकाने भाड्याने दिली असल्याची माहिती पुढे आली. त्याचबरोबर काहींची दोन ते तीन दुकाने असल्याचे उघड झाले. शिंदे यांच्यासोबत पालिकेचे अभियंते सुधीर साळुंखे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
भाडेतत्त्वावर झोपड्यांचा वापर
By admin | Published: June 30, 2017 3:04 AM