प्रदुषण रोखण्यासाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा रस्ते धुण्यासाठी वापर; हवेतील धुळीकणांवरही फवारणी
By नामदेव मोरे | Published: November 22, 2023 06:49 PM2023-11-22T18:49:35+5:302023-11-22T18:49:45+5:30
अत्याधुनिक फवारणी यंत्राचा उपयोग, देशातील सर्वाधीक हवा प्रदुषण होत असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे.
नवी मुंबई : हवा प्रदुषण रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मुख्य रस्त्यांवर व बाजूच्या वृक्षांसह उड्डाणपूलांवरही पाण्याची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मलनिस:रण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. पाण्याच्या फवारणीसाठी दोन मल्टीपर्पज स्प्रेयर आणि डस्ट सेपरेशन वाहनांचा वापर केला जात आहे.
देशातील सर्वाधीक हवा प्रदुषण होत असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. हवेतील धुळीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पामबीच रोडसह ठाणे बेलापूर रोडची यांत्रीकीपद्धतीने साफसफाई केली जात आहे. याशिवाय आता सर्व प्रमुख रस्ते पाण्याचे फवारे मारून धुण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत वायू गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी दोन मल्टीपर्पज स्प्रेयर आणि डस्ट सेपरेशन व्हेईकल उपलब्ध करण्यात आली आहे. या वाहनांच्या माध्यमातून रोडवर पाणी फवारणी केली जात आहे. परिमंडळ एकमध्ये वाशी रेल्वे स्टेशन,छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपरखैरणे ते घणसोली पर्यंतचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.
परिमंडळ दोनमध्ये तुर्भे उड्डाणपूल ते ऐरोली, दिवा ते दिघा गाव परिसरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. या पुढील काळामध्येही रस्त्यांची नियमीत स्वच्छता केली जाणार आहे. रोडवर पाणी फवारणी करण्यासाठी मलनिस:रण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडीही होणार नाही.
रस्ते व हवेतील धुळीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्याधुनीक वाहनांच्या माध्यमातून पाणी फवारणी केली जात आहे. यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिका आवश्यक त्या उपाययोजना करत असून यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे.- राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका