पनवेल : पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. बंदीदरम्यान प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदारांकडून जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणात करण्यात आला आहे. सोमवारी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत आगरी समाज हॉल येथे डांबरीकरणाला सुरुवात केली आहे.पनवेल महापालिकेने आजवर जप्त केलेला चार टन प्लास्टिकचा वापर रस्त्यांमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने अशाप्रकारचा प्रयोग केला आहे.रायगड जिल्ह्यात प्रथमत:च अशाप्रकारे प्लास्टिक मिश्रित डांबरी रस्ता तयार केला जात आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने सर्वप्रथम हा प्रयोग राज्यात सुरू केला. प्लास्टिक आणि डांबरचे मिश्रण तयार करून हा रस्ता तयार केला जात आहे. यामध्ये ९० टक्के डांबर आणि १० टक्के प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. आगरी समाज हॉल ते सावरकर चौक या ५०० मीटरच्या अंतरात हा रस्ता तयार केला जात आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली. प्लास्टिकचा वापर रस्ते निर्मितीत केल्यास रस्त्याचे वयोमान वाढते, रस्ता अधिक मजबूत होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.संबंधित मार्गाच्या डांबरीकरणासाठी २५ लाख एवढा खर्च येणार आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे काही प्रमाणात निधीची बचतही होणार आहे. हॉट मिक्स प्लांटमध्ये डांबर व पिशव्या मिश्रित करून हा रस्ता बनवला गेला आहे.रस्त्याच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर हा नावीन्यपूर्ण उपक्र म आहे. जप्त केलेल्या प्लास्टिकचा यामुळे पुनर्वापर होतो. रायगड जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारच्या रस्त्याची निर्मिती केली गेली आहे .- डॉ. सुधाकर शिंदे,आयुक्त, पनवेल महापालिका
पनवेलमध्ये डांबरीकरणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर , महापालिकेचा प्रयोग : ९० टक्के डांबर व १० टक्के प्लास्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 2:23 AM