रस्ता निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर
By admin | Published: December 29, 2016 02:47 AM2016-12-29T02:47:45+5:302016-12-29T02:47:45+5:30
दैनंदिन गोळा होणाऱ्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणाऱ्या महापालिकेने आता रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : दैनंदिन गोळा होणाऱ्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणाऱ्या महापालिकेने आता रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे १00 मीटर लांबीच्या दहा रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर करण्याची महापालिकेची योजना आहे. या अभिनव प्रयोगामुळे पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.
शहरात निर्माण होणाऱ्या शेकडो टन दैनंदिन घनकचऱ्यावर तुर्भे येथील क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पात घनकचऱ्यापासून खते व फ्युएल पॅलेट्स तयार केल्या जातात, तर प्लास्टिक कचऱ्यापासून दाणे(ग्रॅन्युल्स) तयार केले जातात. टाकाऊ प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले हे दाणे आता डांबरी रस्ते तयार करताना वापरात आणले जाणार आहेत. गेल्या आठवड्यात एमआयडीसीतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी हा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाने आता शहरातील अन्य रस्त्यांच्या निर्मितीसाठी या प्लास्टिकच्या दाण्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणात हे प्लास्टिकयुक्त दाणे वापरल्याने रस्त्यांची लवचिकता वाढते. त्यामुळे रस्त्यांला भेगा पडत नाहीत. तसेच वरील थरामध्ये या प्लास्टिक दाण्यांचा वापर केल्याने रस्त्यांवर पाणी झिरपत नाही. पर्यायाने रस्त्यांचे आयुष्य वाढते, असा महापालिकेच्या संबंधित विभागाचा दावा आहे.
जगात प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने उचललेले पाऊल उपयुक्त व पर्यावरणपूरक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)