नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष पोलीस यंत्रणेकडून भाजपाच्या माजी नगरसेवकांना पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांच्यावरील जुनी प्रकरणे मुद्दाम उकरून काढत, कायदेशीर कारवाईची भीती त्यांना दाखविण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. दरेकर यांनी शनिवारी, ९ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर, झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाच्या दिघा येथील तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत आणि वाशी येथील दोन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेवकांना धाकदपटशहा दाखवून त्यांचे पक्षांतर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला. या पाच जणांनंतर आता दिघा यादव नगर येथील भाजपाचे माजी नगरसेवक राम यादव यांच्यामागे पोलीस यंत्रणा लागली असून, त्यांच्यावर दबाव पक्षांतरासाठी आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या पंधरा दिवसांपासून यादव यांच्यावरील दबाव वाढला असून, त्यांच्यावर हल्ला होण्याची भीतीही निर्माण झालेली आहे. त्यासाठी त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी दरेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. भाजप नगरसेवकांवर आणला जाणार दबाव थांबला नाही, तर भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये पोलीस यंत्रणेचा सहभाग आढळला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पोलीस आपले काम निरपेक्ष पद्धतीने करतील, याची खात्री पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी दिली असल्याचे दरेकर म्हणाले.
यादव यांची पोलीस संरक्षणाची मागणीनगर एमआयडीसी परिसरात राम आशिष यादव गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत असून, दहा वर्षे त्यांनी या भागाचे लोकप्रतिनिधित्व केले आहे. महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांना निवडणूक लढविता येऊ नये, यासाठी राजकीय आकसापोटी आपल्यावर कारवाई होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून, हल्ला होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जीविताचे रक्षण करण्यासाठी पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.