पनवेल : खांदा वसाहतीतील कचरावाहतूक करण्यासाठी सिडको रिफ्युज कॉम्पेक्टर गाड्या (पूर्ण बंद गाड्या) वापरत नसल्याने नागरिक नाराज आहेत. त्याऐवजी सिडको ट्रकमधून कचरा नेत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. सिडकोने रिफ्युज कॉम्पेक्टर गाड्या वापरल्या नाहीत, तर याविरोधात २७ फेब्रुवारीपासून परिवर्तन सामाजिक संस्था कचऱ्याच्या गाड्या रोखून धरणार आहे. याबाबतचे निवेदन संस्थेने सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.खांदा वसाहतीतील परिवर्तन सामाजिक संस्था गेल्या तीन वर्षांपासून घनकचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या संदर्भात पत्रव्यवहार, बैठका, आंदोलन करून पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्यापही सिडकोच्या घनकचरा वाहतुकीमध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबत सिडको उदासिन असल्याचे चित्र आहे. शासनाच्या आरोग्य विषयक धोरणाला मूठमाती देऊन सिडको रिफ्युज कॉम्पेक्टर गाड्या वापरत नसल्याने सिडको नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे. (वार्ताहर)
कचऱ्यासाठी रिफ्युज कॉम्पेक्टर गाडीचा वापर
By admin | Published: February 22, 2017 6:58 AM