पनवेलमध्ये रस्त्यांचा पार्किंगसाठी वापर ; वाहनतळासाठी पुरेशी सुविधा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 02:51 AM2019-12-05T02:51:14+5:302019-12-05T02:51:29+5:30
पनवेल शहरातील रस्ते अतिशय लहान आहेत.
कळंबोली : पनवेल महानगरपालिका हद्दीत आणि सिडको कॉलनीत बिल्डिंगमध्ये वाहने उभे राहण्याकरिता पुरेशी जागा नाही. त्यामुळे रस्त्यावरच ते उभे केले जातात. त्यामध्ये चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे वाहतूककोंडी आणि अपघाताची खूप दाट शक्यता तयार होते. याला सिडकोच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीकरिता आहेत की वाहने उभे करण्यासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पनवेल शहरातील रस्ते अतिशय लहान आहेत. तसेच येथे बांधण्यात आलेल्या ज्या बिल्डिंग आहेत, त्यामध्ये काही ठिकाणी पार्किंगच नाही. एकदम ग्राउंडलाही घरे आहेत. त्यामुळे येथील रहिवासी रस्त्यावर टू व्हीलर आणि फोर व्हीलर उभे करतात. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर, या कॉलनीत अनेक इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. येथेही अनेक इमारतीमध्ये वाहने उभी करण्याकरिता जागा नाही. या विषयांवरून सोसायटीतील रहिवाशांची भांडणे लागतात. त्यामुळे येथे शांतता राहत नाही आणि कायम धूसफूस सुरू राहते. खारघर कॉलनीत ही समस्या अधिक मोठी जाणवते.
या परिसरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांकडे दोन-तीन वाहने आहेत. म्हणून पार्किंगची जागा व वाहनांची संख्या यामध्ये गणित बसत नाही. याच कारणाने अनेक वाहने रस्त्यावर उभी केली जातात. काही सोसायट्यांमध्ये बाहेरच्या वाहनांना येऊ दिले जात नसल्याने तेही रस्त्याच्या बाजूला उभे करून इमारतीत जातात.
कामोठ्यात पार्किंगविषयी अनेक तक्र ारी पोलीस स्टेशनला येतात. रहिवाशांमध्ये वाद होत आहेत. पार्किंगविषयीची भांडणे सोडविण्याकरिता पोलिसांचा वेळ जातो. या इमारतीत एकूण किती फ्लॅट आहेत, त्यानुसार वाहने लावण्याकरिता पुरेशी पार्किंग बिल्डरने सोडली का? या गोष्टी तपासून सिडकोने सीसी व ओसी द्यायला पाहिजे होती; परंतु याकडे ध्यान दिलेच नाही. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
सार्वजनिक पार्किंगची सोय करावी
नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर या सर्वच ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सोय नाही. त्यासाठी सिडकोने भूखंड ठेवला नाही. मात्र, पुढील काळात विचार करून महानगरपालिकेने सर्वच कॉलनीमध्ये पार्किंगकरिता भूखंड सिडकोकडून घ्यावा ही त्यांची जबाबदारी आहे, असा विषय प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी मांडला आहे. सिडकोकडून अशी जागा मिळाली, तर तिथे सार्वजनिक वाहनतळ निर्माण करता येईल आणि तिथे वाहने उभी करता येतील, असे भोपी यांनी सांगितले.
आमच्या वाहतूक शाखेत तीन कॉलनी आहेत. तिथे वाहतूककोंडी होते. त्यातील एक कारण आहे, ते म्हणजे रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आहेत. म्हणून आम्ही सिडकोकडे याविषयी पत्रव्यवहार केला आहे. वाहने उभी करण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्यांच्याकडूनही सहकार्याची भूमिका घेतली जात आहे.
- अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
कळंबोली वाहतूक शाखा
महापालिका हद्दीत वाहने रस्त्यावर उभी केली जातात. ही वस्तुस्थिती आहे तशा तक्र ारी येतात. मात्र, सिडकोने आमच्याकडे रस्ते आणि भूखंड वर्ग केलेले नाहीत. त्यानंतरही सार्वजनिक वाहनतळाबाबत महापालिका धोरण ठरवू शकते.
- संजय कटेकर, नगर अभियंता,
पनवेल महापालिका