नवी मुंबई : पोलिओ डोस पाजण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवून एजन्सीकडून बालकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. सानपाडा स्थानकात असा प्रकार उघडकीस आला असून प्रशासन मात्र त्याबद्दल गाफील आहे.विषाणूंमुळे येणारे अपंगत्व टाळण्यासाठी शून्य ते पाच वर्षातील मुलांना पोलिओचा डोस पाजला जातो. शासनाने ही जबाबदारी स्थानिक प्राधिकरणावर सोपवलेली आहे. त्यानुसार पालिकेकडून विभागनिहाय नागरी आरोग्य केंद्रामार्फत निश्चित दिवशी अभियान राबवले जाते. या अभियानात ज्या बालकांना डोस पाजता आले नाहीत, अशांसाठी अभियानाच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी बुथ लावले जातात. त्याची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत खासगी एजन्सीवर सोपवण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्याकडून प्रौढ स्वयंसेवकांऐवजी शालेय विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. स्वयंसेवकांवर होणारा जादा खर्च टाळण्यासाठी लहान मुलांना रोजंदारीवर वापरले जात आहे. असाच प्रकार सानपाडा रेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी निदर्शनास आला. मात्र पोलिओचे डोस पाजण्यासाठी विद्यार्थ्यांचा होणारा वापर म्हणजे बालकांंच्या जीवाशी खेळ अशी टीका होत आहे. विद्यार्थ्यांकडून डोसचा कमी जास्त प्रमाणात वापर झाल्यास अथवा, त्याची हाताळणी करताना संसर्ग झाल्यास जबाबदार कोण ? असाही प्रश्न निर्माण होत आहे. अशाच प्रकारे इतरही अनेक ठिकाणी पोलिओचे डोस पाजण्यासाठी शाळकरी मुलांचा वापर होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी केला आहे. त्यामुळे पोलिओच्या अभियानात विद्यार्थ्यांना कामगार म्हणून वापरणाºया संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. मात्र पालिकेचा आरोग्य विभाग या प्रकरणात गाफील असल्याचे दिसून येत आहे. पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता, चौकशी करतो असे त्यांनी सांगितले.
पोलिओ अभियानात विद्यार्थ्यांचा वापर; स्वयंसेवकांऐवजी मुलांवर जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:24 AM