टँकरच्या पाण्याचा वापर पिण्यासाठीच

By admin | Published: November 26, 2015 01:51 AM2015-11-26T01:51:49+5:302015-11-26T01:51:49+5:30

सिडको वसाहतीत गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची ओरड असून अनेक ठिकाणी पाणीच जात नाही. त्यामुळे त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे

Use tanker water to drink | टँकरच्या पाण्याचा वापर पिण्यासाठीच

टँकरच्या पाण्याचा वापर पिण्यासाठीच

Next

कळंबोली : सिडको वसाहतीत गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची ओरड असून अनेक ठिकाणी पाणीच जात नाही. त्यामुळे त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तहानलेल्या रहिवाशांची तहान तात्पुरती भागवली जाते. टँकरचे पाणी बांधकामाकरिता नाही तर पिण्याकरिता वापरले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. टँकर बंद करण्याच्या मागणीविरोधात प्रकल्पग्रस्त टँकरमालक आत्माराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत.
कळंबोली, नवीन पनवेल वसाहतींकरिता सिडको महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेते, ते पाणी रहिवाशांना दिले जाते. एमजेपीच्या जुनाट वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले असल्याने सातत्याने शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे दोन्ही वसाहतींना मुबलक पाणी मिळत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून एमजेपीकडून पाण्याची कपात करण्यात आली आहे. कळंबोलीत वसाहतीला तर फक्त २२ ते २४ एमएलडी पाणी मिळत असून नवीन पनवेलची परिस्थिती फारशी वेगळी नाही. सगळ्या सेक्टरमध्ये एकाच वेळी पाणी सोडण्यात येत असल्याने जास्त दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे इमारतींच्या वरच्या मजल्यावर पाणी चढत नसल्याच्या तक्रारी अनेक सोसायट्यांमध्ये आहेत. रोडपाली येथील टोलेजंग इमारतींमध्ये तर पाणीच चढत नसल्याच्या तक्र ारी आहेत. यामुळे येथील रहिवासी त्रस्त आहेत.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की, कळंबोली वसाहत खाली आणि रोडपाली उंचावर असल्याने खाली पाणी जास्त दाबाने जाते, त्यामुळे रोडपालीला मात्र ठणठणाट आहे. नवीन पनवेलमधील सिडको इमारतीत सुध्दा थोड्या फार फरकाने अशीच स्थिती होती. या आणीबाणीच्या काळात टँकरच आधार देत असल्याचे रोडपाली येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. काही राजकीय पक्षांनी मात्र सिडको भवनात जावून टँकर बंद करण्याची मागणी केली. टँकरव्दारे बांधकामांना पाणी नेले जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: Use tanker water to drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.