पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याचा केला वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:22 AM2019-12-22T02:22:33+5:302019-12-22T02:22:46+5:30
पोलीस तपासात निष्पन्न । बांगलादेशी घरजावयाचा प्रताप
मयूर तांबडे
पनवेल : बोगस नाव धारण करून पनवेल तालुक्यात राहणारा इनामुल मुल्ला हा बांगलादेशी बनावट कागदपत्रामुळे चर्चेत आला होता. त्याच्याकडे सापडलेला शाळा सोडल्याचा दाखला हा जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या दाखल्याची झेरॉक्स काढून त्याच्यावर स्वत:चे नाव टाकून घरजावई बनण्याचा प्रताप या बांगलादेशीने केल्याचे समोर आले आहे.
चिखले गावात घरजावई म्हणून राहत असलेला इनामुल मुल्ला हा मनोहर राहू पवार या नावाने वावरत होता. त्याच्या नावावर चिखले येथे घरदेखील आहे. त्याला पारस आणि श्लोक नावाची दोन मुले असून, ती कोन येथील शाळेत शिक्षण घेत आहेत. या बांगलादेशीकडे म्हणजेच मनोहर राहू पवार याच्याकडे बोगस नावाने रेशनकार्ड, लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र सापडून आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे बनविल्याचा गुन्हा दाखल करून शासकीय कार्यालयांना पत्रे लिहून त्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार चिखले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने तो शाळा सोडल्याचा दाखला शाळेने दिला नसल्याचे तालुका पोलिसांना सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेने मनोहर पवार (ईनामुल मुल्ला) याची पत्नी त्याच शाळेत शिकलेली असल्याने त्याच्या पत्नीला शाळा सोडल्याचा दाखला दिला होता. त्याचा गैरवापर करून इनामुल याने त्याची झेरॉक्स काढून त्यावर व्हाइटनर लावले व स्वत:चे नाव टाकले होते. ग्रामपंचायतने मनोहर पवारच्या नावावर असलेल्या घराची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने हे घर विकत घेतलेले आहे. तर रेशनकार्ड काढण्यासाठी देण्यात आलेल्या अॅफिडेव्हिटवर चिखले गावातील एका इसमाने मनोहर राहू पवार याला ओळखतो म्हणून सही केलेली आहे.
देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
घर जावई म्हणून राहणारया ईनामूल उमर मुल्ला उर्फ मनोहर राहू पवार याला बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या व त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाºया व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पनवेल मनसेने केली आहे. तसे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले आहे.