पीयूसी तपासणीसाठी भंगारातील वाहनांचा वापर; आरटीओची डोळेझाक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:24 AM2019-12-11T00:24:11+5:302019-12-11T00:24:23+5:30
पीयूसी तपासणीसाठी नेमलेल्या संस्थांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली होताना दिसून येत आहे.
नवी मुंबई : पीयूसी तपासणीसाठी भंगार अवस्थेतील वाहनांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. अशी वाहने वर्षानुवर्षे रस्त्यांलगत तसेच पदपथांवर उभी करण्यात आली आहेत. त्याकडे आरटीओचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
पीयूसी तपासणीसाठी नेमलेल्या संस्थांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली होताना दिसून येत आहे. ज्या संस्थेला पीयूसी तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत, त्यांच्याकडून संबंधित जागेतच हे काम केले जाणे आवश्यक आहे. त्यामध्ये बहुतांश पेट्रोलपंपाच्या आवारातील पीयूसी तपासणी केंद्रांचा समावेश आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरही ठिकठिकाणी पीयूसी तपासणी करणारी वाहने उभी असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. ही वाहने वर्षानुवर्षे रस्त्यालगत एकाच जागी उभी करण्यात आलेली आहेत, त्याकरिता भंगार अवस्थेतील वाहनांचा वापर केला जात आहे.
रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत तसेच पदपथांवर ही वाहने उभी करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे आवश्यक परवानगीची चौकशी केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यावरून संबंधित सर्वच पीयूसी सेंटरच्या पात्रतेबाबत संशय व्यक्त होत आहे. रस्त्यालगत तसेच पदपथांवर सातत्याने उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्या ठिकाणी स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे. तर त्यांच्याकडून व्यावसायिक वापरासाठी भंगारातील वाहनांचा वापर होत असतानाही आरटीओकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
परिणामी, आरटीओकडून वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट तपासणीच्या पारदर्शकतेबाबतही संशय व्यक्त होत आहे. तर पीयूसी तपासणीसाठी भंगारातील वाहनांचा वापर होत असतानाही, त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे अर्थपूर्ण हितसंबंधाचे कारण असल्याचाही आरोप होत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर तसेच सायन-पनवेल मार्गावर जागोजागी अशी वाहने पाहायला मिळत आहेत. गेले कित्येक महिने ही वाहने एकाच जागी उभी करून त्यामधून पीयूसी सेंटर चालवली जात आहेत. त्यापैकी अनेक वाहनांचे टायरही निखळलेले आहेत, तर संपूर्ण बॉडी निखळलेल्या अवस्थेतही ही वाहने रस्त्यालगत उभी करून त्यांचा वापर केला जात आहे.
पीयूसी सेंटरचालकांकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनालाही पाठीशी घातले जात असल्याचे दिसून येत आहे. यावरून नवी मुंबई आरटीओच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यासंदर्भात आरटीओ अधिकारी दशरथ वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.