नवी मुंबई: झारखंड एटीएसला गेली ९ वर्षे चकमा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टरला वाशीतून अटक करण्यात आली आहे. गुजरातमधून तो केवळ खंडणीसाठी फोन करण्यासाठी वाशीत यायचा. त्यानुसार झारखंड एटीएस व महाराष्ट्र एटीएस यांच्या पथकाने आठवडाभर सापळा रचून त्याला अटक केली आहे.
अमन सुशील श्रीवास्तव (३१) असे अटक केलेल्या झारखंडच्या गॅंगस्टरचे नाव आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, आर्म्स ऍक्ट असे ४० हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, २०१५ पासून झारखंडचे दहशतवाद विरोधी पथक त्याचा शोध घेत होते. मात्र सतत राहण्याचे ठिकाण बदलून व फोनचा वापर टाळून तो चकमा देत होता. परंतु भूमिगत राहूनही तो झारखंडच्या खदान मालक व इतर मोठमोठ्या ठेकेदारांना खंडणीसाठी टेलिग्रामवरून धमकावत असे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या इशाऱ्यावरून टोळीच्या गुंडाने एका व्यवसायिकावर गोळीबार देखील केला आहे. त्यामुळे झारखंड एटीएसने अमनच्या हस्तकांना अटक केल्यानंतर ते त्याच्याही मागावर होते.
यादरम्यान तो वाशीतून धमकी देत असल्याचे समजताच झारखंड एटीएसने महाराष्ट्र एटीएसला कळवले होते. त्यानुसार महाराष्ट्र एटीएस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रांची एटीएसचे प्रमुख आशुतोष सत्यम व नवी मुंबई एटीएसचे अधिकराव पोळ यांच्या पथकाने वाशी स्थानकाबाहेर आठवडाभर पाळत ठेवली होती. त्यामध्ये सोमवारी तो त्यांच्या हाती लागला. अधिक चौकशीत तो गुजरातमधून केवळ फोन करण्यासाठी वाशीत आल्याचे समोर आले. झारखंडच्या व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याकिरता तो टेलिग्राम ऍप वापरायचा. वाशी रेल्वेस्थानकाबाहेर येऊनच तिथले इंटरनेट वापरायचा.
यादरम्यान स्वतःचा मोबाईल मात्र तो बंदच ठेवायचा. व्यावसायिकाला धमकावून झाल्यानंतर तो रेल्वने खारघरला जाऊन तिथून रिक्षाने मुंबईला व तिथून रेल्वेने गुजरातला जायचा. मागील अनेक वर्षांपासून तो रोहन विनोद कुमार या नावाने देशभरात वावरत असल्याने झारखंड एटीएस त्याच्यापर्यंत पोहचू शकले नव्हते. तर गुजरात व इतर ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यासाठी, प्रवासाकरिता तो त्याच नावाचा वापर करत होता.
२०१५ मध्ये वडील सुशील श्रीवास्तवच्या हत्येनंतर तो वडिलांच्याच गँगचा म्होरक्या बनला होता. तेंव्हापासून तो भूमिगत राहूनच गॅंग चालवत होता. गँगच्या सदस्यांना देखील तो प्रत्यक्ष भेटत नव्हता. अधिक वेळ तो गुजरात व दिल्ली याच ठिकाणी ओळख लपवून राहत होता. अखेर एका व्यावसायिकाला धमकावण्यासाठी फोन करण्यासाठी तो वाशीत आला असता त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.