हजारो कोटींच्या गुंतवणुकीने चार चाँद
By नारायण जाधव | Updated: March 3, 2025 10:53 IST2025-03-03T10:52:51+5:302025-03-03T10:53:43+5:30
यामुळे नवी मुंबई शहर शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात भरारी घेणार आहे.

हजारो कोटींच्या गुंतवणुकीने चार चाँद
नवी मुंबई डायरी, नारायण जाधव, उपवृत्तसंपादक
स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत सिडकोने एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरो सिटी या चार प्रकल्पांसह नवी मुंबईत ३० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे हजारोंना राेजगार देणाऱ्या प्रकल्पांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे नवी मुंबई शहर शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात भरारी घेणार आहे.
दावोस परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरो सिटी या चार प्रकल्पांसह २५ हजार कोटी गुंतवणूक अपेक्षित असलेले डेटा सेंटर आणि १५०० कोटींचे लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. ते अटल सेतूमुळे मुंबई महानगरीशी जाेडले गेलेले आहे. तिकडे एमएमआरडीएनेही अटल सेतू परिसरात २२४ गावांच्या जमिनीवर तिसरी मुंबई वसविण्यासाठी हालचाली सुरू करून विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमला आहे. याच भागात डिस्नेलँडच्या धर्तीवर २०० हेक्टरमध्ये वंडरपार्क विकसित होणार असून, रोलर कोस्टर, वॉटर स्लाइड्स आणि लाइव्ह मनोरंजन कार्यक्रमांसह ३५ राइड्स असणार असून, हा प्रकल्प एमएमआरडीएचा ग्रोथ हबच भाग असणार आहे. तिकडे एमएसआरडीसीच्या कोकण ग्रीनफिल्ड हायवेचाच भाग असलेल्या रेवस-करंजा खाडी पुलामुळे नवी मुंबई शहर अलिबागच्या आणखी जवळ येणार आहे.
नवी मुंबई परिसरात एमएमआरडीए, एमएसआरडीसीने प्रस्तावित केलेल्या विकास प्रकल्पांमध्ये सिडको कुठे मागे राहू नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सिडकोचे विजय सिंघल यांनी दावोसच्या गुंतवणूक परिषदेची संधी साधून नुसते सादरीकरण न करता उपरोक्त प्रकल्पांवर स्वाक्षऱ्यादेखील केल्या. यात ८-१० परदेशी विद्यापीठे असणारी एज्युसिटी अर्थात शैक्षणिक शहर प्रमुख असून, येथे २०,००० नोकऱ्या निर्माण होतील. शिवाय पंचशील रिॲल्टीसोबत डेटा सेंटरसाठी २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि वेल्सपून वर्ल्डसोबत १,५०० कोटी रुपयांचा लॉजिस्टिक पार्कचा करार केला असून, यामुळे २,५०० हून अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत.