रोहा : कुंडलिका नदी पूररेषेत सुरू असलेल्या हाफिज इंजिनीअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नियमबाह्य इमारत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी रोहा अष्टमी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दिले. त्याचबरोबर गटनेते महेंद्र दिवेकर यांनी केलेली शिष्टाई आणि मुख्याधिकारी रोहा यांच्या लेखी पत्रानंतर उस्मान रोहेकर यांनी नियमबाह्य बांधकामांविरोधात बुधवारी पालिकेच्या आवारात सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी थांबविले.नगरपरिषदेच्या जिजाऊ माता महिला बचत गट भवनशेजारी हाफिज इंजिनीअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने पर्ल पार्ककॉम्प्लेक्स नाव असणाऱ्या इमारतीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे बांधकाम पूररेषेत असून या बांधकाम कंपनीने पाटबंधारे विभागाकडून नगरपरिषदेकडे नाहरकत दाखला सुपूर्द केलेला नाही. हे बांधकाम पूररेषेत अर्थातच धोकादायक जागेत सुरू असल्याने नगरपरिषदेने संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. असे असतानाही संबंधित कंपनीने सुरू असलेले नियमबाह्य बांधकाम बंद न करता जोमात सुरू ठेवून नगरपरिषदेच्या नोटीसला केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर गटनेते महेंद्र दिवेकर, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम बंद करण्याचे आदेश दिले असतानाही संबंधित बिल्डरने मात्र काम बंद केलेले नाही. संबंधित बिल्डरला नोटीस दिलेली असताना या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे पालिका प्रशासन आणि बिल्डरचे साटेलोटे असल्याची शंका घेत उस्मान रोहेकर यांनी व्यक्त करीत मुख्याधिकारी रोहा यांनी हाफिज बिल्डरचा बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी करीत काँग्रेस नेते उस्मान रोहेकर यांनी बुधवारी नगरपरिषद आवारात आमरण उपोषण सुरू केले होते. रोह्यात बेकायदा बांधकामांच्या विरोधात सक्रि य सहभाग दर्शविणारे गटनेते महेंद्र दिवेकर यांनी केलेल्या शिष्टाईला अखेर यश आले आहे. मुख्याधिकारी रोहा यांनी कारवाईची लेखी हमी दिली आणि महेंद्र दिवेकर यांच्या हस्ते लिंबुपाणी घेऊन रोहेकर यांनी उपोषण थांबविले. (वार्ताहर) रोहा अष्टमी शहरात कुठल्याही नियमबाह्य व बेकायदा बांधकामांना पाठीशी घातले जाणार नाही. अशा बांधकामांवर ठोस कारवाई करण्यात येईल. -महेंद्र दिवेकर, गटनेते, नगरपरिषदनियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांवर योग्य ती पुढील कारवाई करून उपोषणकर्त्यास उपोषणापासून परावृत्त करण्याबाबत आम्ही रोहा अष्टमी नगरपरिषदेला पत्र पाठवून कळविले. - सुरेश काशिद, तहसीलदार, रोहाशहरात राजरोसपणे सुरू असलेल्या नियमबाह्य बांधकामांना प्रशासनाचा प्रत्यक्ष वरदहस्त असल्यानेच बिल्डर बेकायदा कृत्य करतात. हाफिज बिल्डरवर कारवाई न झाल्यास पुनश्च उपोषण करणार.- उस्मान रोहेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
उस्मान रोहेकर यांचे उपोषण मागे
By admin | Published: May 04, 2017 6:07 AM