सायन-पनवेल मार्गावर नेहमीचाच चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:01 AM2018-07-17T02:01:44+5:302018-07-17T06:15:19+5:30
सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे.
- वैभव गायकर
पनवेल : सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. सोमवारी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ७ च्या सुमारास सुरू झालेली वाहतूककोंडी तब्बल दुपारी १.३0 नंतर सुरळीत झाल्याने खारघर ते सीबीडी हा प्रवास गाठण्यासाठी अनेकांना दोन तासांचा कालावधी घालवावा लागला.
सायन-पनवेल महामार्गावरील अर्धवट कामे तसेच पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात जास्त व्यस्त असलेल्या महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग एक आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहनांची गती कमी करावी लागत असल्याने याठिकाणची वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग नियमित लाखो रुपयांचा टोल वसूल करून देखील या रस्त्याच्या दुरु स्तीबाबत उदासीन आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुख्यत्वे कळंबोली, खारघर टोल प्लाझा, कोपरा उड्डाणपूल, सीबीडी उड्डाणपूल, तुर्भे उड्डाणपूल, वाशी गावाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यासह पनवेलच्या दिशेने येताना तुर्भे, सीबीडी, तळोजा लिंक रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने दोन्ही मार्गावर भीषण वाहतूककोंडी होत आहे. पनवेलच्या दिशेने वाशीला जाण्यासाठी यापूर्वी जास्तीत जास्त २0 मिनिटांचा कालावधी लागत होता. मात्र हे अंतर गाठण्यासाठी तब्बल ३ तास वाया घालवावे लागत आहेत. या मार्गावर दोन वर्षांत शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन महिन्यात अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
>रेल्वे प्रवासाला पसंती
कामानिमित्त आपल्या खासगी वाहनांनी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेकांनी सायन-पनवेल महामार्गाने न जाता ट्रेनने जाणे पसंत केले. सकाळपासून सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडीचे फोटो सोशल मीडियासह अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखवल्यामुळे वेळेवर कार्यालयात पोहचण्यासाठी अनेकांनी हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे याकरिता अनेकांनी रेल्वे स्थानकाबाहेर आपली वाहने पार्क केली होती. खारघर रेल्वे स्थानकाबाहेर सुमारे २ किमीपर्यंत वाहने पार्क करण्यात आली होती.
>खड्डे बुजविण्यासाठी पथकाची आवश्यकता
सायन-पनवेल महामार्गावर मोजक्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तात्पुरती दुरु स्ती केल्यानंतर पावसामुळे पुन्हा याठिकाणी खड्डे पडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पथक नेमून याठिकाणी तत्काळ उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
>फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सोमवारी सकाळपासूनच सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. हिरानंदानी उड्डाणपुलापासून ते कळंबोलीपर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. खारघर येथील रहिवाशांनी हे फोटो काढून फेसबुक व व्हॉट्सअॅपवर अपलोड केले. काही काळातच हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले.
>भारती विद्यापीठ सर्व्हिस रोडवर चक्का जाम
खारघर शहरातून सीबीडीकडे जाण्यासाठी भारती विद्यापीठ सर्व्हिस रोड तयार करण्यात आलेला आहे. ऐरवी हा महामार्ग मोकळा असतो. मात्र सायन- पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे अनेक वाहन चालकांनी भारती विद्यापीठ या सर्व्हिस रोडचा वापर केल्यामुळे हा महामार्ग जाम झाला होता. यामुळे सीबीडी शहरातील अंतर्गत रस्ते देखील वाहनांनी गजबजलेले यावेळी पाहावयास मिळाले.
>नवीन पनवेलमधील झोपडपट्टीत पाणी
रविवारी व सोमवार या दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे नवीन पनवेल येथील सेक्टर १ एस याठिकाणी पाण्याचा निचरा योग्यरीत्या झाला नसल्याने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते . याठिकाणी रेल्वेने सुरक्षा भिंत उभारल्याने ही परिस्थिती उद्भवली होती . ४८ तास झोपडपट्टीमध्ये ५ फूट पाणी साचले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
>वाहतूक
पोलिसांची कसोटी
महामार्गावर एक महिन्यापासून रोज वाहतूककोंडी होत आहे. यामुळे तुर्भे, सीबीडी, खारघर व कळंबोली वाहतूक चौकीमधील कर्मचाºयांना २४ तास दक्ष राहावे लागत आहे.
वाशी टोल नाका
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी टोलनाका व गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रोज सकाळी व सायंकाळी याठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.
वाशी प्लाझा
याठिकाणी खासगी वाहने रोडवर मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. रोडच्या मध्यभागी खासगी बसेसही उभ्या रहात असल्यामुळे रोज या ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.
सानपाडा
ठेकेदाराने पुलाखाली सिग्नल बसविलेले नाहीत. पुलाच्या सुरवातीला ब्लिंकर बसविण्यात आले नाहीत यामुळे येथे वारंवार अपघात होवून वाहतूक कोंडी होत आहे. पुलाच्या कठड्याला धडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ंतुर्भे पुलावर
सर्वाधिक कोंडी
सायन - पनवेल महामार्गावर एक महिन्यापासून सर्वाधिक कोंडी तुर्भे पुलावर होत आहे. पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले असून गटारावर स्लॅब नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.
शिरवणे पुलाखाली खड्डे
शिरवणे पूल व पुलाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुलाखाली एक फूट खोलीचा मोठा खड्डा असून त्याचा अंदाज न आल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.
उरण फाटा
याठिकाणी गतवर्षी एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. यावर्षीही खड्ड्यामुळे मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला असून एक टँकर दरीत पडला आहे. याठिकाणी वाहतूककोेंडी व अपघात वाढले आहेत.
सीबीडी पुलाखालीही चक्काजाम
कोकणभवन, सिडकोसह पोलीस मुख्यालयाकडे जाणाºया रोडमुळे सीबीडी सर्कलला महत्त्व आहे. याठिकाणी सिग्नल नाहीत व खड्डेही पडल्यामुळे येथे वारंवार वाहतूककोंडी होत आहे.
खारघर
टोल नाका
खड्डेमय महामार्गावर वाहतूक कोंडी होत असतानाही टोल वसुली थांबविली जात नाही. टोलच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले असून येथे एक ते दोन किलोमीटरच्या रांगा लागत आहेत.
समस्यांचे खारघर
महामार्गावर खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. याठिकाणी दोन्ही लेनवर वाहतूककोंडी होत असून पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कळंबोली व कामोठे
महामार्गाची सुरवात कळंबोलीपासून होते. सुरवातीलाच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रोडवर पाणी साचत असून दिवसभर चक्काजामची स्थिती असते.