व्ही.राधा यांच्या बदलीचे वारे
By admin | Published: May 9, 2016 02:38 AM2016-05-09T02:38:30+5:302016-05-09T02:38:30+5:30
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्यापाठोपाठ आता सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांच्याही बदलीचे वारे वाहू लागले आहेत
नवी मुंबई : सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्यापाठोपाठ आता सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांच्याही बदलीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सिडकोतील अनेक प्रकल्पांची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात संजय भाटीया यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २२ मे रोजी व्ही. राधा यांचा सिडकोतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्यांचीही बदली अटळ मानली जात आहे. कठोर शिस्तीच्या प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या व्ही. राधा यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात आपल्या कामाची चुणूक दाखविली. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाच्या कामात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना सकारात्मक करण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्याचप्रमाणे साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेतील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी त्यांनी कठोर उपाययोजना आखल्या. साडेबारा टक्के विभागातील दलाल आणि बिल्डरांचा हस्तक्षेपाला चाप लावला.
सिडकोबरोबरच्या कराराचे उल्लंघन करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे भूखंड वाटप रद्द करण्याची त्यांनी धडक कारवाई केली. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे प्रकल्पग्रस्तांतून कौतुक होत आहे. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी कमालीची यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी व्ही. राधा यांना पूर्ण मोकळीक दिल्याने त्यांनी विविध स्तरांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला. असे असले तरी यापुढे सिडकोत त्यांना काम करण्याची मोकळीक मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत त्या स्वत: सिडकोत अधिक काळ राहणार नाहीत, असा अंदाज वर्तविला जात आहे. राधा यांचा सिडकोतील कार्यकाळ संपुष्टात आल्याने शासकीय नियमाप्रमाणे बदली होणे अटळ आहे. (प्रतिनिधी)