वृक्ष प्राधिकरणाचे महासभेत वाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:51 AM2018-05-19T02:51:36+5:302018-05-19T02:51:36+5:30
शासन निर्णयानुसार वृक्षलागवडीसाठी महापालिकेकडून वनविभागाला निधी देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. वन विभागात अनेक घोटाळे असल्याने त्यांच्यामार्फत वृक्षलागवड करण्याऐवजी पालिकेनेच हे काम करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई : शासन निर्णयानुसार वृक्षलागवडीसाठी महापालिकेकडून वनविभागाला निधी देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. वन विभागात अनेक घोटाळे असल्याने त्यांच्यामार्फत वृक्षलागवड करण्याऐवजी पालिकेनेच हे काम करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तर अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असतानाही वृक्ष प्राधिकरण त्याकडे डोळेझाक करत असल्याचाही संताप लोकप्रतिनिधींनी सभागृहात व्यक्त केला.
आगामी पावसाळ्यात महापालिकेकडून एक लाख एक हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. राज्य शासनाकडून राबवल्या जात असलेल्या वृक्षलागवड अभियानाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार इलठाणपाडा, रबाळे व महापे येथे २५ हजार, सायन-पनवेल मार्गालगत सहा हजार, तर मोरबे धरणाभोवती ७० हजार झाडे लावली जाणार आहेत, त्याकरिता एकूण ११ कोटी ७५ लाख ७४ हजार ५०० रुपये खर्चाची अपेक्षा आहे. या खर्च मंजुरीचा प्रस्ताव शुक्रवारी महासभेत आला असता, वृक्ष प्राधिकरण विभागाच्या लोकप्रतिनिधींनी वाभाडे काढले. आजवर लावलेल्या वृक्षांचे संवर्धन होत नसून, बेकायदा सुरू असलेल्या जुन्या वृक्षतोडीकडेही वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा संताप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आजवर किती झाडे लावली, त्यापैकी किती झाडे जिवंत आहेत, याची आकडेवारीही त्यांनी सभागृहात मागितली.
अनेक ठिकाणी जुनी झाडे तोडून त्या ठिकाणी नवी झाडे लावली जात असल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला. महापौर बंगला परिसरातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली असल्याचे ते म्हणाले. तर पालिकेकडे स्वत:ची जागाच शिल्लक नसल्याने नेमकी वृक्षलागवड कुठे होते, याच्याही चौकशीची त्यांनी मागणी केली. नगरसेवक गणेश भगत यांनी एनआरआय कॉम्पलेक्सच्या मागील बाजूस लावलेली झाडे पाण्याअभावी जळून गेल्याचीही बाब उघडकीस आणून दिली. या वेळी नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला पैसे का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित केला. वन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असल्याने त्यांनी निधी देण्यास विरोध दर्शवला. पालिकेची स्वत:ची यंत्रणा असल्याने ही वृक्षलागवड पालिकेनेच करण्याचीही मागणी त्यांनी केली. या वेळी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक प्रशांत पाटील, रामदास पवळे यांनीही वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी ‘फिफा’च्या वेळी शहरात मार्गालगत, चौकांमध्ये लावलेली झाडे, लॉन यांची दयनीय अवस्था असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी गवळी देव परिसरात वृक्षलागवडीवर केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला. त्यानुसार महापौर जयवंत सुतार यांनी वृक्षलागवडीच्या कामाचे पालिकेने निरीक्षण करण्याच्या सूचना देत, मोरबे धरणालगत वृक्षलागवड वगळून प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली.