पनवेल : पनवेल पंचायत समितीतील पोषण आहार विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी सुट्टीच्या दिवसासाठी अजब फतवा काढला आहे. सुट्टीच्या दिवसांत शाळेतील शिक्षकांसाठी धान्य वाळवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दीर्घसुट्टी लागणार असल्याचे माहिती असूनदेखील पोषण आहाराचे धान्य का मागवले? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.पनवेल तालुक्यातील शाळांमध्ये येणाऱ्या पोषण आहारासाठी लागणारे धान्य आणि धान्यादी माल वाळवून ठेवण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षकांनाच टार्गेट केले असून, तसे पत्रक शुक्रवारी शिक्षण विभागाचे पोषण आहार अधीक्षक उत्तम कापडणे यांच्या सहीने जारी करण्यात आले आहे. २ मेपासून उन्हाळी सुट्टी असल्याने शालेय पोषण आहार बंद असतो. त्यामुळे या दिवसातील धान्य वाळवण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे भर सुट्टीच्या काळात पोषण आहारातील धान्य वाळविण्याच्या अतिरिक्त कामाच्या बोजामुळे शिक्षकवर्गामध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. सुट्टीच्या दिवसांत काही शिक्षक आपापल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करीत असतात. मात्र, पनवेल शिक्षण विभागाने या शिक्षकांच्या अधिकारांवरच गदा आणल्याचे पत्रक जारी केले आहे. हे पत्र जिल्हा परिषदांच्या शाळांसह माध्यमिक खासगी अनुदानित शाळा आणि अंशत: अनुदानित शाळांसाठी काढण्यात आले आहे.शालेय पोषण आहारासाठी लागणारे अन्न-धान्य शाळेने मागवून ठेवलेले असते. मात्र, सुट्टी लागणार आहे हे माहिती असूनही पोषण आहार विभागाने सुट्टीच्या दिवसातील अतिरिक्त धान्य का मागवून घेतले, हा प्रश्न अधांतरी आहे.
सुट्टीत धान्य वाळवण्याची शिक्षकांवर जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:12 AM