सिकंदर अनवारे
दासगाव : दोन दिवसांवर आलेली होळी, वीकएण्ड, सणानिमित्त आलेला सोमवार-मंगळवार या सणाच्या सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारपासून वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याने मुंबई-गोवा महामार्ग गजबजला आहे.
होळी सण हा इतर सणांप्रमाणे कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सणासाठी कोकणातील चाकरमानी इतर सणांप्रमाणेच मोठ्या संख्येने आपल्या गावी हजर राहतात. चाकरमानी होळीला हजर राहिले नाही तरी शेवटच्या दिवशी होळी लावण्यासाठी व होळीनंतर गावामध्ये देवीच्या पालखीला मान देण्यासाठी हजर राहतात. यंदा शेवटची होळी रविवारी असून धुळवडीचा सण मंगळवारी आहे. यानंतर गावागावामध्ये पालखी फिरवण्याची प्रथा पार पडली जाते. शनिवारपासून पुढे सलग चार दिवस सुट्या असल्याकारणाने कोकणात सणानिमित्त आणि पर्यटन अशा दुहेरी कारणासाठी येणाºया लोकांची गर्दी झाली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारपासून वडखळ ते थेट कोकण पट्ट्यात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी वळणे काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. महाड तालुक्यातील केंबुर्लीजवळ वळणाच्या कामासाठी खोदकाम आणि ब्लास्टिंग काम सुरू आहे. यामुळे काही काळ वाहनांना थांबावे लागत आहे. त्याचप्रमाणे जुन्या महामार्गाचेदेखील खोदकाम सुरू आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गावर जाण्यासाठी गतिरोधक टाकण्यात आले आहेत याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.