पनवेल : पनवेल महापालिकेमार्फत सुरू असलेल्या आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून श्वानदंश लसीचा तुटवडा जाणवत आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून कुत्र्यांचे निर्बीजीकरण बंद असल्याने पालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर श्वानदंश लस उपलब्ध नसल्याने रहिवाशांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. श्वानदंश झाल्यास पालिकेकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना उपलब्ध नसल्याने रेबीज सारख्या आजाराची शक्यता बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये पनवेल शहरात दोन, नवीन पनवेल एक, कामोठे एक, खारघर एक, खारघर एक आदीचा समावेश आहे. कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. श्वानदंश लसीचा पुरवठा शासनाकडून होत असतो. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हा पुरवठा होत नसल्याने पालिका अर्थसंकल्पातील राखीव निधीतून श्वानदंश लस खरेदी करण्याची तरतूद करण्याची मागणी नगरसेवक डॉ. अरुण भगत यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या दृष्टीने पालिकेने मागविलेल्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकाही हतबल झाली आहे. या महिन्यात केवळ एक निविदा पालिकेला प्राप्त झाली होती. मात्र, निविदेचा दर इतर महानगरपालिकेच्या तुलनेत जास्त असल्याने स्थायी समितीने या निविदेला स्थगिती दिली आहे.प्रत्येक महिन्याला ३०० कुत्र्यांची भरपनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला ४५०० ते पाच हजार भटके कुत्रे आहेत. कुत्र्याचे निर्बीजीकरण होत नसल्याने प्रत्येक महिन्याला ३०० च्या आसपास कुत्र्यांची नव्याने भर पडत चालली आहे. कुत्र्याच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून श्वानदंशाच्या घटना दिवसागणिक वाढत चालल्या आहेत.
पनवेल महापालिकेत श्वानदंश लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:54 PM