लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली या तीन रुग्णालयातील केंद्रात लस दिली जात आहे. अधिकाधिक नागरिकांना लस घेता यावी, या उद्देशाने ११ मार्चपासून या तिन्ही केंद्रांत २४ तास लसीकरण केले जाणार आहे. तसेच केंद्राच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
नवी मुंबईत १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मंगळवारपर्यंत ३३,०६९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असणारे ४५ ते ५९ वर्षं वयाच्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी सकाळी ९ ते सांयकाळी ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. परंतु विविध कारणांमुळे नोकरीधंद्यावर असणाऱ्यांना या वेळेत लस घेता येत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्र आणि वेळ वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयात गुरुवारपासून २४ तास लसीकरण होणार आहे.
नऊ आरोग्य केंद्रांतही सुरू सध्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली या तीन महापालिकेच्या रुग्णालयांसह अकरा खासगी रुग्णालयांत आठवड्याचे सहा दिवस लसीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या चार आरोग्य केंद्रांत आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लस दिली जात आहे. परंतु लसीकरणाला गती मिळावी तसेच अधिकाधिक लोकांना लस घेता यावी, या अद्देशाने सीबीडी, कुकशेत, करावे, शिरवणे, जुहूगाव, घणसोली, ऐरोली, दिघा व इलठाणपाडा या नऊ नागरी आरोग्य केंद्रातसुद्धा लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात सध्या २७ लसीकरण केंद्र सुरू असून, येत्या काळात ही संख्या ३२ पर्यंत नेण्याचा मनोदय आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला आहे.