लसीकरणामुळे तिसरी लाट रोखता येणार, कोरोनाला रोखण्यासाठी सुविधांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:54 AM2021-05-13T10:54:50+5:302021-05-13T10:55:26+5:30
कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभागाकडून पनवेल तालुक्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार यापुढे वैद्यकीय उपचार आणि लसीकरणावर भर देणार आहे.
अरुणकुमार मेहत्रे -
कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको वसाहतीसह २९ महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पालिका आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर पनवेल ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्णांची संख्या घटत असून, नवीन रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभागाकडून पनवेल तालुक्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार यापुढे वैद्यकीय उपचार आणि लसीकरणावर भर देणार आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली; तर मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले होते. यंदा कोरोनाची दुसरी लाट खूप हानिकारक ठरली. त्यात वैद्यकीय सेवा अपुरी तसेच लसीकरणाचा तुटवडा भासल्याने अनेक कोरोना रुग्णांचे मोठे हाल झाले. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने पनवेल पालिका क्षेत्रात बेडची कमतरता भासू लागली होती. त्यानुसार पनवेल पालिकासह तालुक्यातील नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही साथ मिळाली आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी चांगलेच लक्ष दिले आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासकीय पनवेल उपजिल्हा रुग्णालय, इंडिया बुल्स, कळंबोली समाजमंदिर येथे कोविड सेंटरची उभारणी केली. सद्य:परिस्थितीत भारतीय कपास निगमच्या गोदामामध्ये ८०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर लसीकरण वाढवण्यात येत आहे. कोविड टेस्ट करणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता रुग्ण कमी सापडत असल्याने कोरोना नियंत्रणात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
लसीकरणासाठी नियोजन सुरू
येथील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी उसळत आहे. ४५ वयोगटातील नागरिकांना दुसऱ्या कोविड डोससाठी मोठी कसरत करावी लागत आहे. लसीकरणाचा तुटवडा त्याचबरोबर कमी लसीकरण केंद्रे आणि कोविन ॲप नोंदणी होत नसल्याने उडणारा गोंधळ यामुळे नागरिकांमध्ये
चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्य:परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. भकोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय उपचार वाढविण्यात येत आहेत. त्याचबरोबर नियोजनासह लसीकरणावर भर देण्यात येणार आहे.
- डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, महापालिका पनवेल