नवी मुंबई : आयुक्त अभिजीत बांगर यांनी अचानक विविध विभागांना भेटी देण्यास सुरुवात केल्यामुळे महानगरपालिकेच्या कार्यांलयांमधील लेट येणाऱ्यांवर वचक बसण्यास सुरुवात झाली आहे. नाताळच्या सलग सुट्ट्यानंतरही सोमवारीही ९० टक्के कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. वेळेत कामे न करणारांवर व गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केल्यामुळे हा फरक पडला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून विविध कार्यालयांमध्ये कर्मचारी वेळेवर हजर होत नसल्याच्या व वेळेत काम केले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्ताकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आयुक्तांनी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, ऐरोली विभाग कार्यालय व इतर कार्यालयांस अचानक भेटी देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान गैरहजर असलेले डॉक्टर व वेळेत काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. लोकमतनेही वेळेत कर्मचारी हजर नसल्याचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते. यामुळे कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. नाताळच्या सुट्टीनंतर सोमवारी मनपा मुख्यालयात कर्मचारी वेळेत येतात का याची पाहणी केली असता जवळपास ९० टक्के कर्मचारी वेळेत आल्याचे व आल्यानंतर तत्काळ काम सुरू केल्याचे निदर्शनास आले. शिक्षण, मालमत्ता, जनसंपर्क, प्रशासन, अभियांत्रिकी विभागातील बहुतांश कर्मचारी वेळेवर हजर झाले होते. १० टक्के कर्मचारी अर्धा तास ते एक तास उशिरा हजर झाल्याचे पाहावयास मिळाले.
मुख्यालयाबरोबर विभाग कार्यालय, रुग्णालयातील उपस्थितीही समाधानकारक होती. आयुक्तांनी अचानक भेटी देण्यास सुरुवात केल्यामुळे हा बदल घडल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु यामध्ये सातत्य राहणार का, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. जोपर्यंत थंम मशीनप्रमाणे वेतन काढले जाणार नाही तोपर्यंत कर्मचारी वेळेवर हजर राहणार नाहीत, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.