वाशीतील हरितपट्टा जाहिरातदाराला आंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:48 AM2018-03-28T00:48:02+5:302018-03-28T00:48:02+5:30
वाशीतील रस्ते दुभाजकांवर विकसित केलेले हरितपट्टे जाहिरातदारांसाठी आंदण ठरले आहेत
नवी मुंबई : वाशीतील रस्ते दुभाजकांवर विकसित केलेले हरितपट्टे जाहिरातदारांसाठी आंदण ठरले आहेत. वाशी ते कोपरखैरणे दरम्यान सुमारे तीन किमी रस्त्याच्या दुभाजकावर महापालिकेने विविध जातीची रोपटी लावून हा संपूर्ण पट्टा सुशोभित केला आहे. परंतु त्याच वेळी हा संपूर्ण पट्टा देखरेखीच्या नावाखाली एका खासगी व्यावसायिक कंपनीला दिला आहे. संबंधित कंपनीने या पट्ट्यावर जाहिरातबाजी करण्यासाठी अंतराअंतरावर लोखंडी फलक लावले आहेत. त्यामुळे या हरितपट्ट्याच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.
महापालिकेने शहरात ठिकठिकाणी हरितपट्टे विकसित केले आहेत. वापराविना पडून किंबहुना कोणत्याही वापरास योग्य नसलेल्या मोकळ्या जागेवर हिरवळ विकसित करून तो परिसर सुशोभित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामात सातत्य राहावे यासाठी खासगी व्यावसायिक व सामाजिक संस्थांना हे हरितपट्टे देखरेखीसाठी देण्यात आले आहेत. यात हॉटेल्स, हॉस्पिटल्स बिल्डर्स आणि इतर व्यावसायिकांचा समावेश आहे. वाशी ते कोपरखैरणे मार्गावर वरिष्ठा हॉटेल चौक ते ब्लू डायमंड चौकापर्यंतचा पट्टा कोपरखैरणेतील स्नेहसाईदीप हॉस्पिटलने देखरेखीसाठी घेतला आहे. त्यानुसार या संपूर्ण पट्ट्यात ठिकठिकाणी हॉस्पिटलच्या नावाचे फलक लावले आहेत. ब्लू डायमंड ते शिवाजी चौकापर्यंतच्या पट्ट्यात मागे लखानी बिल्डर्सचे जाहिरात फलक लागले होते. परंतु अलीकडेच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणानंतर हे फलक काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी नवीन फलक लावले आहेत. हे फलक सध्या कोरे असून ते कोणत्या एजन्सीला दिले आहेत, याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण फुटा- फुटाच्या अंतरावर लावलेल्या या फलकामुळे हरितपट्ट्यातील रोपटी गायब झाली आहेत.
एकूणच हा हरितपट्टा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी आहे, की फुकट्या जाहिरातबाजीसाठी असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.