भाजपाच्या लावारिसांकडून वाजपेयींच्या अंत्ययात्रेचे फोटो मोदींच्या रॅलीसाठी वापरले - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 09:06 PM2019-04-25T21:06:31+5:302019-04-25T21:07:47+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही कामोठे, पनवेलमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही कामोठे, पनवेलमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी जेंव्हा निवडणुकीचा फॉर्म भरला, त्यावेळेला रॅलीत किती गर्दी जमली होती. हे दाखवण्यासाठी त्यांनी खोटे फोटो वापरले. भाजपाच्या लावारिस आयटीसेलने अटलजींच्या अंत्ययात्रेतील फुटेज आणि फोटो मोदींच्या निवडणुकीत फॉर्म भरतानाचे असल्याचे दाखविले, असं सांगत राज ठाकरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार मोदी देणार होते त्याचं काय झालं? मेक इन इंडियाचं काय झालं? स्टार्ट अप इंडियाचं काय झालं?नोटबंदी कोणालाही विश्वासात न घेता का लादली? ह्या नोटबंदीच्या रांगेत अनेक माणसं गेली, 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यावर मोदी कधी बोलणार? असे सवाल करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
मोदींच्या काळात अनेक उद्योगपती बँकांना बुडवून देशाबाहेर फरार झाले. निरव मोदींवर केसेस होत्या, सीबीआय पण एका प्रकरणात्याची चौकशी करत होते पण तरीही निरव मोदी देश सोडून पळून जाऊच कसा शकला? विजय माल्ल्यानी 9000 कोटी रुपयांचं बँकांच कर्ज थकवलं होतं, पण विजय मल्ल्या हे पैसे भरायला तयार होते. पण त्यांना मोदी सरकारकडून का संधी दिली नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच, 1 लाख 12 हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून देखील त्याला राफेलची विमान बनवायची संधी कशी दिली? कुठला अनुभव होता अनिल अंबानीना? असे म्हणत राफेल डीलवरुन मोदी सरकारवर टीका केली.
RBI च्या फंडाला हात घालायची जर सरकारवर वेळ येत असेल तर मोदी पुलवामा हल्ल्यानंतर कशाच्या जीवावर युद्ध करायला निघाले होते?बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये किती माणसं मारली गेली ह्याचा तपशील आमच्याकडे नाही असं हवाईदल प्रमुख सांगत असताना, 250 माणसं मारली गेली हा दावा अमित शाह कुठून करत होते, असं राज ठाकरे म्हणाले.
पंतप्रधानांनी जे गाव दत्तक घेतलं तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचं पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचं कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचं पाणी वाहतंय, गावात रोगराई पसरली आहे. मोदींनी दत्तक घेतलेलं गाव सुधारू शकलं नाही ते देश काय सुधारणार, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
गेली साडेचार वर्ष सेना भाजपा एकमेकांच्या उरावर बसत होते, मग युती झालीच कशी? हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेवर टीका केली.