नवी मुंबई : कोणत्याही राज्याच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था आणि प्रवासी वाहतूक यंत्रणेचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यानुसार राज्य सरकारने अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मागील काही काळात त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे, असे प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बीओसीआय या संस्थेच्या वतीने सुरक्षित, स्मार्ट आणि टिकाऊ प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देणारा अर्थात सेफ, स्मार्ट अॅण्ड सस्टेंबल पॅसेंजर मोबिलिटी या संकल्पनेवर आधारित दुसऱ्या प्रवासी-१९ या परिषदेचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाºया प्रवासी दळणवळण परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते व अन्य मान्यवर उपस्थित होते. येत्या काळात वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर दिला जात आहे. पुढील २० वर्षांत हे बदल दिसून येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवास हा उपक्रम या सर्व प्रयत्नांना प्रोत्साहन देणारा असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
सुरक्षित आणि सुखकर प्रवासाच्या दृष्टीने राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या सेवेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. या प्रसंगी मिझोरामचे परिवहन राज्यमंत्री टी. जे. लालनुंतलोअंगा यांच्यासह विविध मोटर निर्मिती कंपन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. आयोजन समितीचे सचिव जगदीश पाटणकर यांनी आपल्या प्रस्ताविक पर भाषणातून प्रवास-१९ या परिषदेचा हेतू विशद केला. तीन दिवस चालणाºया या परिषदेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या अनुषंगाने जुन्या आणि नव्या आधुनिक वाहनांचे प्रदर्शन मांडण्यात आले.