भावी पोलिसांची निवाऱ्यासाठी वणवण, रोडवरच रात्रभर मुक्काम, सामाजिक संस्थांकडूनही मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:48 AM2018-03-18T02:48:00+5:302018-03-18T02:48:00+5:30

Vannavan for future police recruitment, stay overnight on the road and social organizations also do not help | भावी पोलिसांची निवाऱ्यासाठी वणवण, रोडवरच रात्रभर मुक्काम, सामाजिक संस्थांकडूनही मदत नाही

भावी पोलिसांची निवाऱ्यासाठी वणवण, रोडवरच रात्रभर मुक्काम, सामाजिक संस्थांकडूनही मदत नाही

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या २८ हजार उमेदवारांपैकी १२०० उमेदवारांची रोज मैदानी चाचणी घेतली जात आहे. राज्याच्या कानाकोपºयातून चाचणीसाठी आलेल्या तरुणांच्या वास्तव्यासाठी काहीच व्यवस्था नाही. उमेदवारांना रोडवरच मुक्काम करावा लागत आहे. या तरुणांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सामाजिक संस्था व शासकीय, निमशासकीय संस्थांनीही मदतीसाठी हात आखडता घेतला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रिक्त १७५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांसाठी सुमारे २८ हजार उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची छाती, उंची मोजमाप तसेच मैदानी चाचणी प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. या चाचणीकरिता प्रतिदिन सुमारे १२00 उमेदवारांना बोलावले जात आहे. कळंबोली पोलीस मुख्यालयालगत मैदानावर छाती, उंची मोजमाप झाल्यानंतर पात्र उमेदवारांची दुसºया दिवशी खारघर येथे धावण्याची चाचणी होत आहे. चाचणीवेळी उमेदवारांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता सकाळी लवकरच प्रक्रियेला सुरवात केली जाते. त्यामुळे उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तीन ते चार दिवस परिसरातच मुक्कामी राहावे लागत आहे. यादरम्यान रात्र कुठे घालवायची असा प्रश्न त्यांना सतावत आहे. कळंबोली व खारघर परिसरात अनेक महाविद्यालये, धार्मिक, सामाजिक संस्थांच्या वास्तू आहेत. रात्र निवाºयाची सोय व्हावी याकरिता उमेदवारांनी त्यांचे दरवाजे ठोठावून देखील त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. परिणामी अशा संस्थांच्या बाहेर किंवा रेल्वेस्थानकात उघड्यावर व मैदानावरच त्यांना रात्र काढावी लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
शहरातील तरुणांच्या तुलनेत गावाकडील तरुण शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याने ते मैदानी चाचणीत बाजी मारतात. याच उद्देशाने पोलीस भरतीवेळी राज्याच्या दुर्गम भागातील उमेदवार मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत अर्ज करतात. परंतु शहरात निवाºयाच्या सोयीअभावी उघड्यावर रात्र काढल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. पोलिसांकडून उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा पुरवल्या जातात. परंतु त्या सुविधा चाचणी मैदानाच्या आतच मर्यादित असल्याने मैदानाबाहेर त्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागते.

मदतीमध्येही कंजुषी
धार्मिक, सामाजिक संस्था यांचे कार्य समाजातील ठरावीकच घटकापुरते मर्यादित राहता कामा नये. एखादी आपत्ती अथवा पोलीस भरतीसारख्या प्रसंगी त्या वास्तूचा वापर निवाºयासाठी खुला होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याने भावी पोलिसांचे परीक्षा काळातच खच्चीकरण होताना दिसत आहे.

प्रसाधनगृहही नाही
चाचणीसाठी रात्रीच मैदानाबाहेर उमेदवार जमत असल्याने त्याठिकाणी त्यांच्या शौचालयाची गैरसोय होत आहे. कळंबोली येथे ज्याठिकाणी २०० ते ३०० उमेदवार रस्त्यावर मुक्कामी आहेत, त्याठिकाणी एकमेव ई-टॉयलेट आहे. त्यांच्यासाठी ते अपुरे पडत असल्याने त्यांना उघड्यावर नैसर्गिक विधी उरकावा लागत आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न उद्भवून आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

डेंग्यू, मलेरियाची भीती
कळंबोली, पनवेल परिसरामध्ये डासांचा उपद्रव जास्त आहे. भरतीसाठी आलेले तरुण रोडवर व रेल्वे स्टेशनमध्येच मुक्काम करत आहेत. डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डासांपासून वाचण्यासाठी अनेक जण शेकोटी करत असून धूर करत आहेत.

Web Title: Vannavan for future police recruitment, stay overnight on the road and social organizations also do not help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.