वनराईत डेब्रिज माफियांचा धुमाकूळ
By admin | Published: May 15, 2017 12:46 AM2017-05-15T00:46:10+5:302017-05-15T00:46:10+5:30
शहरात डेब्रिज माफियांनी पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. खाडी किनारे, मोकळ्या मैदानानंतर आता या माफियांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरात डेब्रिज माफियांनी पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. खाडी किनारे, मोकळ्या मैदानानंतर आता या माफियांनी घणसोलीतील वनराईकडे आले लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणी दिवसाला डेब्रिजच्या शेकडो गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. दिवसाढवळ्या चालणाऱ्या या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने घणसोलीतील या वनराईचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
डेब्रिज माफियांना प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर भरारी पथके तैनात केली आहेत. शहरात डेब्रिजची वाहतूक करणे व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियमाने संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवाना नसलेल्या गाड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश भरारी पथकांना देण्यात आले आहेत. परंतु या पथकांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने डेब्रिज माफियांचे चांगलेच फावले आहे. याचा परिणाम म्हणून सर्रासपणे विनापरवाना डेब्रिजची वाहतूक व विल्हेवाट लावली जात आहे. मागील काही दिवसांपासून या माफियांनी घणसोलीतील हिरव्यागार वनराईकडे लक्ष केंद्रित केले आहे.
घणसोली गावालगत जुने सद्गुरू हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल सध्या बंद असले तरी त्याच्या मागील बाजूस विस्तीर्ण वनराई आहे. यात मोठमोठे वृक्ष आहेत. घणसोली नोडमधून गावात जाण्याचा मार्ग याच वनराईतून जातो. परंतु मागील काही दिवसांपासून या वनराईत मोठ्याप्रमाणात डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. सध्या मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू आहेत. नाल्यातील उपसलेला गाळ ट्रकमध्ये भरून या वनराईत आणून टाकला जात आहे. शिवाय बांधकामातून निघणारे डेब्रिजचीही येथे डम्प केले जात आहे. वाशी, कोपरखैरणे, घणसोली या भागातून दरदिवशी ड्रेब्रिजने भरलेले शेकडो ट्रक या ठिकाणी रिकामे केले जात आहेत. त्यामुळे घणसोलीतील या वनराईच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.