धाटाव : तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतील बहुचर्चित वरसे जिल्हा परिषद मतदार संघाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या मतदार संघाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्याने, स्थानिक नेत्यांसमवेत स्थानिक मतदार संघासहित लगतच्या मतदार संघाच्या इच्छुक उमेद्वारांचेही लक्ष लागून राहिले आहे. या मतदार संघातून कोकण युवती संघटक अदिती तटकरे, स्थानिक उमेदवार म्हणून धाटाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैशाली मोरे, तर धाटावचे सरपंच विनोद पाशिलकर यांच्या सुविद्य पत्नी विजया पाशिलकर यांच्या नावाचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.रोहा तालुक्यातून सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या वरसे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते, शिक्षण व आरोग्य सभापती भाई पाशिलकर हे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, या मतदार संघाच्या वाट्याला सर्वसाधारण महिला आरक्षण आल्यामुळे इच्छुकांच्या आशेवर मात्र विरजन पडल्याचे दिसते. या आरक्षणामुळे राष्ट्रवादीच्या पाटलांनाही चांगलाच फटका बसला असल्याने त्यांनीही आपला मोर्चा लगतच्या मतदार संघाकडे वळविल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीही सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या मतदार संघाकडे जातीनेच लक्ष घातल्याचे समजते. (वार्ताहर)
वरसे मतदार संघाकडे साऱ्यांचेच लक्ष
By admin | Published: December 26, 2016 7:03 AM