- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
पनवेल महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी शहरात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे झेंडे व चिन्हे असलेल्या टोप्या तसेच कमळ, कपबशी, घड्याळ, धनुष्यबाण, इंजिन आणि पंजा या चिन्हांची उपकरणे शहरात दाखल झाली आहेत. प्लॅस्टिकचे बिल्ले, तोरण, कटआउट इत्यादी प्रचाराच्या साहित्यांनी वातावरण निर्मिती सुरू केली आहे. पक्षांच्या चिन्हांचे एलईडी ‘ब्रेसलेट’ हे या निवडणुकीच्या प्रचाराचे वैशिष्ट्य असणार आहे. प्लॅस्टिकबरोबर कागदी आणि पर्यावरणपूरक प्रचार साहित्यही विक्रेत्यांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. इलेक्शन....... नो टेंशन अशी जाहिरात करून इच्छुकांना आकर्षित करण्यात येत आहे.शहरात पनवेल महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कोपरा सभा, आंदोलने व विविध कार्यक्र मांसाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रचार साहित्याची गरज भासते. त्यासाठी शेकाप, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय, भारिप-बहुजन इत्यादी पक्षांचे नाव, नेत्यांची छबी असलेले प्रचार साहित्य पनवेलमध्ये दाखल झाले आहे. प्रचारासाठी आवश्यक झेंडे हे साधारण टेरिकॉट, कॉटन अथवा सॅटिनच्या कापडापासून तयार केले जातात. यात दहा बाय पंधरा इंचांपासून ते चाळीस बाय साठ इंचापर्यंतच्या झेंड्यांचा समावेश आहे. मागणीनुसारही झेंडे आणि साहित्य तयार करून दिले जाते. महापालिका निवडणुकीत पक्षाबरोबरच उमेदवाराचे नाव, पद महत्त्वाचे असते. त्यामुळे उमेदवारांच्या नावाच्या टोप्या, टी शर्टवर संबंधित पक्षाचे नाव किंवा चिन्ह इत्यादी मागणीनुसार छापून दिले जात आहे. निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मागणीनुसार प्रचार साहित्य उपलब्ध करून दिले जाते. प्रचाराच्या साहित्याची तयारी तीन महिन्यांपासून सुरू केली असून त्यासाठी सुरत, दिल्ली व मुंबई आदी ठिकाणांवरून माल मागविला जातो. पनवेलमध्ये गेली अनेक वर्षे निवडणुकीकरिता एका प्रिंटर्सच्या माध्यमातून महामार्गालगत एका दुकानात प्रचार साहित्य मिळते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी हे दालन उघडण्यात आले होते. ती निवडणूक संपल्यानंतर मध्यंतरी बंद ठेवण्यात आले होते. परंतु पनवेल महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा दुकान सुरू झाले आहे. मतदार यादीही उपलब्धया ठिकाणी अल्फाबेटिकल मतदार यादीबरोबरच सर्च इंजिन सॉफ्टवेअर, संगणकीकृत रंगीत मतदार स्लिप, हॅँडबिल, पोस्टर्स, अहवाल पुस्तिका, डमी व्होटिंग मशिनसुध्दा उपलब्ध असल्याचे विक्रेत्याने सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून पनवेलमध्ये निवडणूक साहित्य उपलब्ध करून देतो. या वेळी पनवेल महानगरपालिका झाल्याने अधिक उमेदवार असणार आहेत. त्यामुळे प्रचार साहित्य सुध्दा जास्त लागणार आहे. त्यादृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. सध्या झेंड्यांना अधिक मागणी असल्याचे प्रचाराचे साहित्य विकणाऱ्या शंकर नागराजे यांनी सांगितले.