नवी मुंबई : दिल्ली येथे पार पडलेल्या मिसेस इंडिया क्वीन आॅफ सबस्टन्स स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावित वाशीच्या शिवानी नाईक-शहा यांनी अजिंक्यपद पटकाविले आहे. तर बिहारची शिवांग सराफ आणि युनायटेड किंगडमच्या डॉ. अमनप्रीत या प्रथम उपविजेत्या ठरल्या आहेत. नोएडाच्या अंशू वर्षनी या द्वितीय उपविजेत्या ठरल्या.तीन दिवसीय या स्पर्धेत सात विविध प्रकारच्या फेऱ्यांचा समावेश होता. विविध पातळीवर स्पर्धकांमधील गुणांची पडताळणी करत उत्तमोत्तम स्पर्धकाची निवड करण्यात आली. यंदाची स्पर्धा ही खरोखरच खूप महत्त्वाची आणि तितकीच अवघडही असल्याची प्रतिक्रिया मिसेस इंडिया क्वीनच्या विजेत्या शिवानी नाईक-शहा यांनी व्यक्त केली आहे. सर्वच स्पर्धक तितकेच ताकदीचे होते. त्यामुळे ही चुरशीची लढत ठरली. या स्पर्धेदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तराने शिवानी नाईक-शहा यांनी उपस्थितांची तसेच परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत एकूण ४७ स्पर्धकांनी भागत घेतला. सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी व पूनम ढिल्लो यांच्या हस्ते शिवानी यांना अजिंक्यपदाचा मुकूट बहाल करण्यात आला. मूळची रायगड जिल्ह्यातील असलेली शिवानी यांचा गेल्यावर्षी ‘लोकमत’ने ‘लोकमत सखी सन्माना’ने गौरव केला होता. दरम्यान, विविध स्तरांमधून शिवानी नाईक-शहा यांच्या या यशाबद्दल कौतुक केले जात असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याची प्रतिक्रिया त्यांचे पती कुशल शहा यांनी व्यक्त केली आहे.
वाशीची शिवानी ‘मिसेस इंडिया क्वीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:03 AM