राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 04:06 PM2021-01-28T16:06:01+5:302021-01-28T16:08:27+5:30
२०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. या प्रकरणात आता खुद्द राज ठाकरेंनाही कोर्टात हजर राहावं लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ६ फेब्रुवारी रोजी वाशी कोर्टात हजर रहावे लागणार आहे. त्यासंदर्भातील आदेश कोर्टाने जारी केले आहेत. २०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. या प्रकरणात आता खुद्द राज ठाकरेंनाही कोर्टात हजर राहावं लागणार आहे.
वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी २०१८ आणि २०२० मध्येही राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात आले होते. आता या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायाधीशांनी राज ठाकरे यांनी कोर्टात हजर राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ६ फेब्रुवारी रोजी राज ठाकरे कोर्टात हजर राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
२६ जानेवारी २०१४ साली राज ठाकरे यांनी वाशी येथे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात टोलनाक्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच कार्यकर्त्यांना टोलनाके बंद पाडण्यासाठी चिथावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मनसेच्या या मेळाव्यानंतर नवी मुंबईचे मनसेचे नेते गजानन काळे यांनी काही कार्यकर्त्यांसह वाशी टोल नाक्यावर तोडफोड केली होती. यात टोलनाक्याचं प्रचंड नुकसान झालं होतं. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ३० जानेवारी २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.