सक्तीच्या देणगीवरुन वाशीत गौरी गणरायाचे विसर्जन थांबले
By admin | Published: September 11, 2016 02:41 AM2016-09-11T02:41:58+5:302016-09-11T02:41:58+5:30
श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी सक्तीने देणगी मागीतली जात असल्याचा प्रकार पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान वाशी तलावावर उघडकीस आला.
नवी मुंबई : श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी सक्तीने देणगी मागीतली जात असल्याचा प्रकार पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान वाशी तलावावर उघडकीस आला. यावेळी सक्तीने देणगी घेणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाईचे निर्देश देताच स्वयंसेवकांनी गणेशमुर्तींचे विसर्जन थांबवले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विसर्जनाच्या प्रक्रियेला पुन्हा सुरूवात झाली.
वाशी येथील तलावात विसर्जन करण्यासाठी स्वयंसेवक गणेशभक्तांकडून सक्तीने देणगी घेत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. हि देणगी स्विकारण्यासाठी विसर्जन तलावावर दानपेटी देखिल ठेवण्यात आली होती. स्वयंसेवकांना महापालिका मानधन देत असतानाही देणगी उकळली जात होती. शिवाय काही गणेशभक्तांनी देखिल आयुक्तांकडे स्वयंसेवकांच्या मनामानी कारभाराची थेट तक्रार केली. त्यामुळे देणगी घेणाऱ्या स्वयंसेवकांवर कारवाई करण्याच्या सुचना आयुक्तांनी पोलिसांना केल्या. त्यानुसार उपस्थित पोलिसांनी काही स्वयंसेवकांना ताब्यात घेताच सर्वच स्वयंसेवकांनी विसर्जन थांबवले. सुमारे १० ते १५ मिनिंटे चाललेल्या या प्रकारामुळे विसर्जन केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ उपआयुक्त प्रशांत खैरे, वरिष्ठ निरिक्षक अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विसर्जनाची प्रक्रीया सुरु करण्याच्या पोलिसांनी सुचना करुनही स्वयंसेवक तलावाबाहेर येवून थांबले. पालिकेसाठी आपण काम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलीस मित्र म्हणुन काम करण्याचे पोलिसांचे आवाहन स्विकारत स्वयंसेवकांनी विसर्जनाला सुरवात केली.
आयुक्तांना निदर्शनास आलेला हाच प्रकार शहरातील सर्वच विसर्जन स्थळांवरुन होत असतो. स्वयंसेवकांकडून मुर्ती विसर्जनासाठी सक्तीने देणगी मागीतली जात असल्यामुळे अनेकदा गणेशभक्तांसोबत त्यांचे वाद होत असतात. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी घेतलेल्या भूमिकेचे शहरातील गणेशभक्तांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)