वाशी-कोपरखैरणे मार्गाची चाळण
By Admin | Published: June 30, 2017 03:02 AM2017-06-30T03:02:46+5:302017-06-30T03:02:46+5:30
शहरात मागील काही दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशी-कोपरखैरणे मार्गाची चाळण झाली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरात मागील काही दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाशी-कोपरखैरणे मार्गाची चाळण झाली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रहदारीच्या मुख्य मार्गावर सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.
पहिल्याच पावसाने शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कामाची पोलखोल केली आहे. त्यामध्ये वाशी-कोपरखैरणे या दोन प्रमुख विभागांना जोडणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. या मार्गावर सकाळ-संध्याकाळ वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशातच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्याचे डांबर उखडून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यापैकी काही ठिकाणी प्रतिवर्षी पावसाळ्यात खड्डा पडून पाणी साचलेले असते. खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. याच मार्गावर ब्ल्यू डायमंड चौकात यापूर्वी असे काही अपघात घडलेले आहेत. सुमारे दोन फूट खोलीचा खड्डा त्या ठिकाणी पडल्याने अपघातसदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. अखेर गुरुवारी त्या ठिकाणचा खड्डा बुजवण्यात आला. मात्र, तात्पुरत्या स्वरूपाचे काम केल्यामुळे खड्ड्यात टाकलेली रेती रस्त्यावर पसरून अपघाताचा धोका कायम राहिलेला आहे. तर या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यालगत पाणी साचून रस्ता खचून नवा खड्डा तयार झाला आहे. अशीच परिस्थिची डी-मार्ट चौकात तयार झाली आहे. वाशीकडून कोपरखैरणेकडे येणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या गटाराचे झाकण तुटले असल्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेत पालिकेने त्या ठिकाणी दुरुस्तीचे कामही केले; परंतु पावसामुळे
गटाराचे झाकण पुन्हा उघड्यावर आले आहे.
ब्ल्यू डायमंड चौकात एपीएमसी मार्गे येणारी वाहने, तर डी-मार्ट चौकात कोपरखैरणे स्थानकाकडून येणारी वाहने यांची संख्या मोठी आहे. यामुळे सकाळ- संध्याकाळ सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशातच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होऊन सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांंच्या रांगा लागत आहेत. या प्रकारामुळे वाशीकडून कोपरखैरणेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची कोंडी होऊन त्रास सहन करावा लागत आहे.