नवी मुंबई : बेशिस्त रिक्षाचालकांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात वाशी रेल्वेस्थानक येथील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला होता, त्यामुळे काही वेळासाठी प्रवाशांची गैरसोय झाली होती. अखेर वाशी पोलीसठाण्यात झालेल्या बैठकीअंती रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले.
वाशी वाहतूक शाखेकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. त्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, लेनची शिस्त न पाळणे, चालक परवाना नसणे, अशा कारवाया केल्या जात आहेत; परंतु सतत होत असलेल्या या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावर आवश्यक ठिकाणी रिक्षा थांबे नाहीत, त्यामुळे रिक्षाचालकांना नाईलाजाने रस्त्यावर थांबावे लागत असल्याचेही रिक्षाचालक-मालक युनियनचे अध्यक्ष सुनील बोर्डे यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले; परंतु आरटीओ स्तरावर रखडलेल्या निर्णयांचा वाहतुकीवर परिणाम नको, अशी वाहतूक पोलिसांची भूमिका आहे. शिवाय, लोकप्रतिनिधींकडून देखील रस्त्यांवरील अवैध रिक्षा थांब्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम सतत राबवली जात असल्याचे वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. या कारवाया थांबवाव्यात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे असल्याने त्यांनी बुधवारी अचानक रिक्षा बंद आंदोलन केले. एप्रिल महिन्यातही याच युनियनने अशा प्रकारे कारवाई विरोधात भूमिका घेतली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी वाशी पोलीसठाण्यात बैठक घेण्यात आली. या वेळी रिक्षाचालकांनी रिक्षा थांबे नसणे, खड्ड्यांमुळे होणारे त्रास अशा समस्या मांडल्या. त्या निकाली लागेपर्यंत कारवाईचे स्वरूप तीव्र न करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात पुढील बैठकीपर्यंत कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांनी बंद मागे घेतला. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या रिक्षाचालकांवर यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांनीही रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.