नवी मुंबई : महामुंबई परिसरातील सर्वच शहरांत गेल्या काही दिवसांपासून हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शहरात महापालिकांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. आता नवी मुंबई वाहतूक पोलिसांनीही प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांवर धडक कारवाईची मोहीम शनिवारी दिवसभर राबविली. यानुसार दुपारपर्यंत ६५ वाहनांवर कारवाई केली होती. संध्याकाळपर्यंत ही संख्या १०० वर गेली असल्याची माहिती वरिष्ठ वाहतूक निरीक्षक सतीश कदम यांनी दिली.
वाशी टोलनाका येथे सकाळपासून सुरू केलेल्या या माेहिमेत वरिष्ठ निरीक्षकांसह सहायक निरीक्षक आणि आठ पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतल्याचे कदम यांनी सांगितले.
याची केली तपासणी
धूर ओकणाऱ्या वाहनांच्या पीयूसीची तपासणी करून तिची मुदत संपलेली वाहने, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करता रेती, खडीची वाहतूक करणारे ट्रक, डंपर यांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच काहींचे चालान फाडण्यात आले. पोलिसांनी राबविलेल्या या कारवाईचा वाहनचालकांनी चांगलाच धसका घेतला.