वाशीतील पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात; पादचाऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:11 AM2019-12-30T01:11:44+5:302019-12-30T01:11:46+5:30
कारवाईकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
नवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, फेरीवाल्यांकडून पदपथ तसेच रस्ते बळकावले जात असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशाच प्रकारातून वाशी परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाशी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सरसकट अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसर स्वच्छ केला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ बळकावल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम पादचाऱ्यांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरात अशाच प्रकारातून सतत वाहतूककोंडी होत असते, तर प्रत्येक रविवारी तिथल्या रस्त्यांवर बाजार भरू लागला आहे. फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात पदपथांपाठोपाठ रस्तेदेखील फेरीवाल्यांच्या घश्यात जाण्याची भीती वर्तविली जात आहे. व्यावसायिक गाळ्यांच्या बाहेरही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून मार्जिनल स्पेसवर साहित्य मांडले जात असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. विभाग कार्यालयाच्या परिसरात हे दृश्य नजरेस पडत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.